सांगली : शिवाजी स्टेडियममध्ये क्रिकेटमैदान नको : बचाव समितीची मागणी | पुढारी

सांगली : शिवाजी स्टेडियममध्ये क्रिकेटमैदान नको : बचाव समितीची मागणी

सांगली  पुढारी वृत्तसेवा : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकास आराखड्यामध्ये सर्व खेळांचा समावेश करावा. तसेच संपूर्ण मैदान क्रिकेटसाठी गवत लावून 65 यार्ड बंदिस्त करण्याची मागणी विविध क्रीडा संघटना आणि खेळाडूंनी केली आहे.

महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथील क्रीडांगणावर सर्व खेळ बाबींचा समावेश न करता फक्त क्रिकेटसाठी तीन कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र या क्रीडांगणावर अ‍ॅथलेटिक, खो – खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, मल्लखांब, जिमनॅस्टिक, हॅन्डबॉल, थ्रोबॉल, सॉफ्टबॉल, नेटबॉल, टेनिसबॉल क्रिकेट, तायक्वांदो, बॉक्सिंग यांचा सराव, स्पर्धा होतात. विविध खेळातून हजारो खेळाडू राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवले आहे.

नियोजित आराखड्यानुसार स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान साकारण्यात येणार आहे. मात्र तांत्रिक बाबीचा विचार करता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारण्याकरिता किमान 10 एकर क्षेत्र अपेक्षित आहे. मात्र सध्या उपलब्ध निधी व अपुर्‍या जागेअभावी पूर्तता होणे शक्य नाही. पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे 30 यार्ड क्रिकेटचे मैदान आणि उर्वरित जागेत इतर खेळ अशा आराखड्यास कोणाचाही विरोध नाही.

खरे तर मैदानात पावसाचे आणि पुराचे पाणी साचून राहते, त्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी प्रथम उपाययोजना केल्या पाहिजेत. अन्यथा मैदानावर होणारा कोट्यवधींचा खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याची टीका यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार, नितीन शिंदे, राजू कदम, बापू समलेवाले, जहाँगीर तांबोळी, सुभाष घार्गे, संतोष लोखंडे, अविनाश सावंत, सुरेश चौधरी उपस्थित होते.

Back to top button