

सातारा, पुढारी वृत्तसेवा : शालेय विद्यार्थी दररोज शाळेत जात असताना सरसकट पुस्तके व वह्या घेवून जात असतात. शासनाने आदेश देवूनही विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे जास्त असल्याने त्यांना पाठीच्या आजाराचे दुखणे वाढले आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडून दप्तराची तपासणी शासन आदेशानुसार केली जात नसल्याचे समोर येत आहे. या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कधी कमी होणार, असा प्रश्न पालकांना सतावू लागला आहे.
माहिती व तंत्रज्ञानाच्या जमान्यात शिक्षणाला जास्त महत्व आलं आहे. बाल चिमुरड्यांना प्राथमिक शिक्षण घेत असताना 4 ते 5 किलोची बॅग पाठीवर घेवून शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे ही मुले शाळेतून घरी आल्यानंतर आई, बाबा माझी पाठ दाबणार का? असे प्रश्न करु लागले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी आज दप्तरांच्या ओझ्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यासाठी दप्तरातील अनावश्यक साहित्य कमी होणे गरजेचे आहे. मराठी माध्यमांबरोबरच इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या शालेय साहित्याचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनांच्या मानाने जास्त आहे.
दप्तराचे ओझे हा पालकांसाठी आता चिंतेचा विषय झाला आहे. तसेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र या शासन आदेशाचे मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा व्यवस्थापनाकडून पालन होताना दिसत नसल्यानेच विद्यार्थी आज दप्तराच्या ओझ्याखाली पुर्णपणे दबलेला दिसत आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही केली
पाहिजे.
अधिक वजनाच्या दप्तरामुळे होणारा त्रास
मुलांमध्ये पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे, स्नायु आखडणे, मणक्याची झीज होणे, मान दुखणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यासारखे आजार होवू शकतात. तसेच मुलांच्या शारिरीक वाढीवर अनिष्ट परिणाम होवू शकतो. बालवयात विद्यार्थ्यांच्या शरीरावर होणार्या अनिष्ट परिणामामुळे भविष्यातही त्यांना अनेक शारिरीक, मानसिक व्याधी जडू शकतात.
विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचे असे असावे वजन?
इयत्ता पहिली 1800 ग्रॅम, इयत्ता दुसरी 1785 ग्रॅम, इयत्ता तिसरी 2400 ग्रॅम, इयत्ता चौथी 2685 ग्रॅम, इयत्ता पाचवी 3125 ग्रॅम, इयत्ता सहावी 3141 ग्रॅम, इयत्ता सातवी 3357 ग्रॅम व इयत्ता आठवी 3425 ग्रॅम इतके शालेय साहित्याचे वजन असावे.
पालकांनी घ्यावयाची काळजी
पालकाने आपल्या मुलांच्या दप्तराचे वजन मुलाच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे याची काळजी घ्यावयाची आहे. त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांचे वजन माहित करून घ्यावे. पहिल्या वर्गातील मुलाचे सर्वसाधारण वजन 20 किलो तर आठव्या वर्गातील मुलांचे सर्वसाधारण वजय 42 किलो इतके असते. पहिल्या वर्गातील मुलांच्या दप्तराचे वजन 2 किलो तर आठव्या वर्गातील मुलाच्या दप्तराचे वजन 4.2 किलोपेक्षा अधिक असू नये. पोषण आहार देणार्या प्रत्येक शाळेमध्ये वजन करण्याची सोय आहे. या शाळेमध्ये दर तीन महिन्यानीं प्रत्येक मुलांचे वजन केले जाते. दप्तराचे वजन 10 टक्क्यांच्या आत न आल्यास मुख्याध्यापकासोबत चर्चा करून वेळापत्रकामध्ये शाळेसाठी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी. पालकांनी शाळेने दिलेले वेळापत्रक पाहून शाळेत लागणारे आवश्यक तेवढेच साहित्य दप्तरात टाकावे, बाकीचे साहित्य घरीच ठेवावे. तसेच कमी वजनाची बॅग विकत घ्यावी.