सातारा : ‘चवर’ फुलू लागले! ‘कास’ खुलू लागले!!

सातारा : ‘चवर’ फुलू लागले! ‘कास’ खुलू लागले!!
Published on
Updated on

सातारा : संजीव कदम

पाऊस पडून गेल्यावर,
मन भिरभिरता पारवा…
पाऊस पडून गेल्यावर,
मन गारठता गारवा…

या काव्याची अनुभूती यावी, असे विलोभनीय निसर्गसौंदर्य जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेल्या सातारा जिल्ह्यातील कास परिसरातील डोंगरदर्‍यांत सध्या अवतरले आहे. पठारावर आता कुठे सह्याद्रीच्या व कोकण रांगांमध्ये आढळणारी 'चवर' जातीची वनस्पती फुलू लागली असून, या फुलांची नजाकत पर्यटकांना आतापासूनच खुणावू लागली आहे. साधारणत: ऑगस्टच्या महिनाअखेर हे पठार फुलांच्या विविध रंगसंगतीने बहरणार असून, त्यादरम्यानच फुलांच्या हंगामाला खरी सुरुवात होणार आहे. विविधरंगी फुलांची नजाकत यंदाही पर्यटकांना खुणावत आहे.

कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्‍चिम घाटातील 39 ठिकाणांपैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदांसमोर पश्‍चिम घाटाला जागतिक वारसास्थळाचे नामांकन मिळाले. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसास्थळ म्हणून नामांकन प्राप्‍त झालेले ठिकाण आहे.

कास पुष्प पठाराची जैवविविधता जोपासून ती वाढवण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थांचा मोठा वाटा आहे. कास पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची 1,213 मीटर असून, पर्जन्यमान अंदाजे अडीच ते तीन हजार मि.मी. इतके आहे. कास पठार हे 1,792 हेक्टरवर पसरले आहे.

मान्सून चालू झाला की, कासवरील फुलांचा बहर सुरू होतो. साधारणत:, सप्टेंबरच्या दरम्यान हा हंगाम ऐन बहरात येतो. यादरम्यान जागतिक पातळीवरील पर्यटक मोठ्या संख्येने या पठाराला भेट देत असतात. यंदाही या हंगामाची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगररांगा हिरवळल्या आहेत. पठार व परिसराचे रूपडे पालटले आहे. कास तलाव व पठारावर पर्यटकांची पावले पडू लागली आहेत. तरुणाई यथेच्छ घिरट्या घालताना दिसत आहे.

पठारावर सध्या काही फुलांच्या रंगछटा पाहायला मिळत असून, चवर ही वनस्पती फुलू लागली आहे. ती सह्याद्रीच्या व कोकण रांगांमध्ये दिसत असते. ही आल्याच्या वर्गातील असून, जमिनीमध्ये हळद किंवा आल्यासारखे लांबट आकाराचे कंद असते. कंदातून पांढर्‍या रंगाची ही फुले उमलताना दिसत आहेत. पांढर्‍या रंगाची चवर व तांबड्या रंगाची चवर अशा भिन्‍न जाती आहेत. याची पाने करदळीच्या पानांसारखी लांबट असून, सध्या या फुलांनी पठारावर बहर आला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news