

महाड ; पुढारी वृत्तसेवा महाडचे आराध्य दैवत म्हणून सर्वदूर सुपरिचित असलेल्या श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवानिमित्त राज्य शासनाने महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मागणीची त्वरित दखल घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले होते, त्यानुसार रायगड पोलीस दलामार्फत आज सकाळी साडेअकरा वाजता श्री वीरेश्वर महाराजांना एक अधिकारी व आठ पोलीस कर्मचाऱ्यांकडून सशस्त्र सलामी देण्यात आली.
महाड मधील शिवभक्तांची गेल्या अनेक दशकांची मागणी आजच्या या मानवंदनेने पूर्णत्वास गेल्याबद्दल उपस्थित शेकडो शिवभक्त नागरिकांनी वीरेश्वर महाराजांचा जयजयकार करीत घोषणाबाजी केली. यावेळी नागरिकांनी राज्य शासन तसेच आमदार भरत शेठ गोगावले यांना धन्यवाद दिले.
श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला तसेच या मंदिराला शिवकालीन इतिहास असल्याचे दाखले प्राप्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या नियमित दौऱ्याची सुरुवात वीरेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन करीत असत. यामुळेच या मंदिराचे असलेले ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन महाड मधील श्री वीरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सरपंच तसेच सर्व विश्वस्तांनी महाड नागरिकांच्या भावनेची दखल घेत राज्य शासनाकडे गेल्या अनेक दशकांपासून रोहा येथे श्री धावीर महाराजांना दिल्या जाणाऱ्या मानवंदने प्रमाणे शासकीय पोलीस मानवंदना दिली जावी अशी मागणी लावून धरली होती. दोन दिवसांपूर्वी उत्सव काळा दरम्यान आमदार गोगावले मंदिरामध्ये आले असताना शिवसेना शहरप्रमुख नितीन पावले यांनी ग्रामस्थांची गेल्या अनेक दशकांची मागणी त्या ठिकाणी आलेल्या रायगड पोलीस अधीक्षक गर्गे यांच्याकडे मांडली होती. यावेळी आमदार गोगावले यांनी तातडीने यावर कार्यवाही करण्याचे सूचीत संकेत दिले होते.
24 तासांमध्येच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान त्यांनी महाडवासियांची असणारी ही मागणी पूर्णत्वास नेली. त्यामुळे महाड तालुक्यातील सर्व शिवभक्तांमधून आनंद व्यक्त होत आहे.
आज सकाळपासूनच महाड शहरातील हजारो शिवभक्त या ऐतिहासिक मानवंदनेचे साक्षीदार होण्यासाठी श्री वीरेश्वर महाराज मंदिर परिसरामध्ये जमा झाले होते. वीरेश्वर महाराजांची पालखी नेहमीच्या परंपरेनुसार गाडीतळातून धावत येऊन मंदिराला प्रदक्षिणा घातल्यावर मानवंदनेसाठी ठेवलेले स्थानावर स्थानापन्न करण्यात आली. त्यानंतर महाड शहर पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार यांच्यासह रायगड पोलीस दलाचे नऊ कर्मचाऱ्यांनी या मानवंदनेमध्ये सहभाग घेतला. या ऐतिहासिक ठरणाऱ्या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितले की, महाड शिवभक्तांची गेल्या अनेक दशकांची मागणी पूर्णत्वास जावी म्हणून आपण प्रयत्नशील होतो. दोन दिवसापूर्वी मंदिरामध्ये झालेल्या चर्चेनंतर तातडीने मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात घेतलेल्या निर्णयाने आपण शिवभक्तांचे मनोकामना पूर्ण करू शकलो हे आपण कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून केल्याचे त्यांनी विनम्रपणे आपल्या प्रतिक्रियांमध्ये नमूद केले.
वीरेश्वर देवस्थानचे सरपंच दीपक शेठ वारंगे यांनी आज श्रीविरेश्वर महाराजांना सुरू झालेली मानवंदना लक्षात घेता महाडचा हा छबिना उत्सव आता इतिहासामध्ये नोंदविला जाईल अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या, तर माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप कामत यांनी आजचा हा दिवस महाडकर नागरिकांसाठी अविस्मरणीय असून, शासनाने पोलीस दलाची मानवंदना सुरू केल्याबद्दल धन्यवाद दिले.
हेही वाचा :