

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : समाज माध्यम व प्रसार माध्यमांसमोर जाहीरपणे एकमेकींशी भांडणार्या दोन महिला अधिकार्यांसह एका अधिकार्याच्या पतीचीही सरकारने बदली केली आहे. दोन्ही महिला अधिकार्यांना तूर्त कोणतेही पद देण्यात आलेले नाही. मात्र, दोघींच्या भांडणाची शिक्षा एकीच्या पतीलाही मिळाली आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या आयएएस अधिकार्याच्या पत्नीनेही या प्रकरणात आता प्रवेश केल्याने हा वाद लवकर शमण्याची चिन्हे नाहीत.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सूचनेवरून प्रशासन विभागाने मंगळवारी बदलीची कारवाई केली. आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी आणि आयपीएस अधिकारी डी. रूपा रविवारपासून एकमेकींशी समाज माध्यमांवर भांडत आहेत. परिणामी, सोमवारी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही महिला अधिकार्यांना नोटीस पाठवण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा यांना केली होती. तर मंगळवारी सिंधुरी, रूपा यांच्यासह रूपा यांचे पती आणि बेळगावमध्येही जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावलेले मनिष मौदगील अशा तिघांच्या बदलीचा आदेश बजावण्यात आला.
धर्मादाय खात्याच्या आयुक्त असणार्या रोहिणी सिंधुरी आणि हस्तकला महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक असणार्या रूपा यांचे पद आणि स्थळ निश्चित न करताच बदली आदेश जारी करण्यात आला. रोहिणी यांच्या जागी बसवराजेंद्र एच. यांची नेमणूक करण्यात आली आहे. रूपा यांच्या जागी भारती डी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व्हे अँड लँड रेकॉर्ड आयुक्त असलेले मनिष मौदगिल यांची प्रशासकीय सुधारणा खात्याचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी त्याच खात्याचे अतिरिक्त आयुक्त सी.एन.सुरेंद्र यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारने अधिकार्यांची उचलबांगडी करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत.
आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांचे वैयक्तिक फोटो त्यांच्या मोबाईलवरून तीन पुरुष आयएएस अधिकार्यांना पाठवण्यात आले आहेत. असे फोटो पाठवून सिंधुरी यांना काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न करत आयपीएस अधिकारी डी. रूपा यांनी फेसबुकवर 19 आरोप केले होते. शिवाय कुणाही एका अधिकार्याने आपले वैयक्तिक फोटो इतर अधिकार्यांना पाठवणे, हा सेवा नियमांचा भंग आहे, असा त्यांचा आरोप आहे.
सिंधुरी यांनी रूपा यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, रूपा यांनी त्या तीन पुरुष अधिकार्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान दिले. तर सिंधुरी यांचे पती सुधीर रेड्डी यांनी सोमवारी पोलिस फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आयपीएस डी रूपा यांनी रोहिणी सिंधुरी यांचा मोबाईल ब्ल्युटूथद्वारे हॅक करून त्यातून खासगी फोटो काढून ते व्हायरल केले आहेत. त्यामुळे ही सायबर चोरी असून त्यांच्यावर कारवाई करावी.
प्रामाणिक आयएएस अधिकारी अशी ओळख असलेले मनिष मौदगिल यांचीही रुपा-सिंधुरी वादात बदली झाली आहे. त्यांची बदली का करण्यात आली, याचे कारण मात्र सरकारने दिलेले नाही. त्यांच्या पत्नी रुपा यांनी सिंधुरी यांच्यावर आरोप केल्यामुळे त्याची शिक्षा म्हणून ही बदली करण्यात आल्याचे मानले जाते.