

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवत इतिहास रचणारा भाला फेक अॅथलिट नीरज चोपडा चे लक्ष्य पुढील वर्षी अमेरिकेत होणार्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे आहे.
जागतिक चॅम्पियनशिप अमेरिकेच्या इयुगेनमध्ये यावर्षी होणार होती; पण कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलल्यानंतर स्पर्धेचे आयोजन 2022 मध्ये करण्याचा निर्णय झाला. या चॅम्पियनशिपचे आयोजन 15 ते 24 जुलै 2022 मध्ये होणार आहे.
नीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीच्या फायनलमध्ये 87.58 मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले. हे भारताचे ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्स प्रकारात पहिले सुवर्णपदक आहे. तर, वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे.
नीरज पत्रकार परिषदेत म्हणाला की, 'मी आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये यापूर्वीच सुवर्णपदक जिंकले आहे आणि आता माझ्याकडे ऑलिम्पिक सुवर्णपदकदेखील आहे. त्यामुळे आता माझे लक्ष्य हे पुढील वर्षी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवण्याकडे आहे. जागतिक चॅम्पियनशिप ही मोठी स्पर्धा आहे आणि कधी कधी येथे ऑलिम्पिकपेक्षा अधिक चुरस पाहायला मिळते. मी ऑलिम्पिक सुवर्णपदकाने संतुष्ट होणार नाही. मी यापेक्षा चांगली कामगिरी करू इच्छितो.'
'राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पाचव्या स्थानी राहूनदेखील भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) राष्ट्रीय शिबिरात सहभागी करून घेतले. हा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय ठरला,' असे नीरजला वाटते. तो म्हणाला की, 'माझा सराव चांगला सुरू होता; पण सुविधा, उपकरण आणि आहार तिथे (पंचकुला) चांगला नव्हता. मात्र, जेव्हा मी राष्ट्रीय शिबिरात आलो तेव्हा सर्व काही बदलले. मला चांगल्या सुविधा, आहार आणि उपकरण राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाल्यावर मिळालेे.'