

मुंबई, पुढारी ऑनलाईन : वांद्रे मतदारसंघात २०१५ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना पराभूत करणाऱ्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनीच आज राणे यांचे मुंबईत स्वागत केले. कधीकाळी राणेंविरोधात निवडणूक लढविलेल्या सावंत आज त्यांच्या स्वागताला गेल्या हा योगायोग जनआशीर्वाद यात्रेमुळे आला.
सावंत या शिवसेनेच्या बिनीच्या शिलेदार होत्या. नारायण राणे यांचा पराभव केल्याने सेनेत त्यांचे वजन होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली. परिणामी येथे काँग्रेसची जागा निवडून आली.
२०१५ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार, बाळा सावंत यांचे निधन झाले.
या जागेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक नारायण राणे यांना काँग्रेसने तिकिट दिले.
त्यावेळी बाळा सांवत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेने तिकिट दिले.
शिवसेनेच्या अंगणातील ही निवडणूक राज्यभर गाजली होती. राणे यांनीही जोरदार ताकद लावली होती.
मात्र, मतदारांनी सावंत यांच्या पारड्यात मते टाकली आणि तब्बल २० हजार मतांनी तृप्ती सावंत जिंकून आल्या.
या विजयामुळे सावंत यांची शिवसेनेत हवा झाली. कलानगरमध्ये मातोश्रीच्या अंगणात नारायण राणे यांना पराभव पत्करावा लागल्याने शिवसैनिकांना बळ आले.
त्यांनी त्यावेळी केलेला जल्लोष अभूतपूर्व होता.
२०१५ मध्ये नारायण राणे यांना पराभूत करणाऱ्या सावंत यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र, शिवसेनेने तिकीट नाकारले.
मातोश्री निवासस्थान ज्या भागात आहे. तो कलानगर भाग वांद्रे पूर्व मतदारसंघात येतो तेथे शिवसेनेला हमखास यश मिळते.
२०१९ मध्ये सावंत यांना तिकिट नाकारून मुंबई पालिकेचे तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज असलेल्या सावंत यांनी बंडखोरी केली.
त्यांनी शिवसेना सोडून अपक्ष निवडणूक लढविली. मात्र, त्या पराभूत झाल्या. या बंडखोरीमुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला.
सावंत यांनी शिवसेना सोडली असली तरी त्या कोणत्या पक्षात गेल्या नव्हत्या. मात्र, ६ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी भाजपात प्रवेश केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये तृप्ती सावंत यांचा भाजपला उपयोग होऊ शकतो या शक्यतेने त्यांना प्रवेश दिला आहे. तसेच आज नारायण राणे यांच्या सत्काराचा मान देऊन भाजप आपली चाल खेळत आहे.