सांधेदुखीचा त्रास : वेदनेपासून सुटका | पुढारी

सांधेदुखीचा त्रास : वेदनेपासून सुटका

डॉ. मनोज कुंभार

एका ठराविक वयानंतर सांधेदुखीचा त्रास महिलांमध्ये सामान्य समस्या बनल्याचे दिसते. या त्रासापासून आराम मिळण्यासाठी अनेकदा आपण ऐकीव किंवा घरगुती उपाय करतो; पण अशावेळी स्वतःच डॉक्टर बनण्याऐवजी वेदनेपासून सुटका मिळविण्यासाठी योग्य उपाय आणि पद्धत वापरावी.

आरोग्याशी संबंधित कुठल्याही समस्येवर उपाय शोधण्यापूर्वी सर्वात प्रथम हा त्रास आपल्याला का होत आहे? हे जाणून घेणे आवश्यक असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय काय करत आहोत, याचा प्रथम विचार करावा. सांधेदुखीचा त्रास असाध्य अजिबात नाही. तसेच त्यापासून सुटका करण्यासाठी काही तास व्यायाम करण्याचीही गरज आहे. आपला आहार आणि आपण करत असणारे काम हे आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच असले पाहिजे.

आपल्या मनाने उपचार घेणे वा गोळ्या घेणे सुरू करण्यापेक्षा चांगल्या डॉक्टरांचा याबाबत सल्‍ला घ्यावा. कारण, ते केवळ आपली समस्या उत्तमप्रकारे समजू शकतात असे नाही, तर त्यावरील उपायदेखील ते चांगल्याप्रकारे सांगू शकतात. वेदनेपासून सुटका मिळवायची असल्यास योग्य स्थितीत झोपणेदेखील गरजेचे असते. झोपण्याची योग्य पद्धत म्हणजे, पाठीवर झोपणे किंवा एका कुशीवर झोपणे होय. झोपताना शरीराची स्थिती अशी असावी ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या

वेदना वाढवणार्‍या स्थितीत अजिबात झोपू नये. शरीराच्या ज्या भागात वेदना होत असतील त्या भागावर झोपताना दाब पडणार नाही, याकडे लक्ष द्यावे. याव्यतिरिक्‍त वेदनेपासून लढण्यासाठी आपल्या आहारातदेखील योग्य बदल करावा.

पोषक घटकांनी युक्‍त असा आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे, तळलेले पदार्थ कमीत कमी खावेत, आहारात नियमितपणे हिरव्या भाज्या, कडधान्ये, अक्रोड, उकडलेली अंडी यांचा समावेश करावा. सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी रोज मोकळ्या जागेत नियमितपणे व्यायाम करणेदेखील गरजेचे आहे.

आयसोमेट्रिक नी एक्सरसाईज : हा एक असा व्यायाम आहे, जो आपण घरी दिवसा कुठल्याही वेळी सहज करू शकतो. या व्यायामामुळे मांड्या आणि मागचा भाग मजबूत बनतो. हा व्यायाम करण्यासाठी आपले पाय सरळ पसरवून जमिनीवर बसावे. ज्या गुडघ्यात वेदना आहेत, त्याच्या खाली उशी ठेवावी. आपल्या पायांचे स्नायू मजबूत बनविण्यासाठी पंजे पुढच्या बाजूला खेचावेत. काही वेळ त्याच स्थितीत थांबावे आणि पुन्हा सामान्य स्थितीत यावे. काही वेळ ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी.

आयसोमेट्रिक नेक अँड शोल्डर एक्सरसाईज : घरीच तीन-चारवेळा हा व्यायाम करू शकतो. त्यासाठी डोके आणि मान सरळ करून बसावे. हात कानाच्या वर ठेवावेत आणि हाताच्या पंजांनी डोक्यावर दाब द्यावा. डोके न हलवता ही क्रिया दोन्ही हातांनी आठ ते दहावेळा करावी. यामुळे मानेच्या दुखण्यावर आराम मिळतो. खांदे मजबूत करण्यासाठी दोन्ही हात समोरच्या भिंतीवर ठेवून हातावर दाब द्यावा. पाच ते दहा सेकंदानंतर तेथून हात काढवा आणि आठ ते दहा वेळेला ही क्रिया करावी.

आयसोमेट्रिक अ‍ॅबडॉमिनल एक्सरसाईज : पाठीवर जमिनीवर झोपावे. दोन्ही हातांनी जमिनीवर दाब द्यावा आणि दोन्ही पाय एकाचवेळी जमिनीवरून समांतर उचलावेत. यामुळे आपल्या पोटाचे स्नायू मजबूत होतील. ही स्थिती काही सेकंद कायम ठेवावी. हळूच पाय जमिनीवर आणावेत. ही क्रिया चार ते सातवेळा करावी.

मसाज थेरपी : वेदनेपासून आराम मिळण्यासाठी मालिश अर्थात मसाज करण्याचादेखील सल्‍ला दिला जातो. एखाद्या चांगल्या थेरपिस्टकडून नियमितपणे मालिश करून घेतल्यास सांधेदुखी कमी होते. केवळ पंधरा-वीस मिनिटे नियमित मालिश केल्यास वेदनेपासून आराम मिळतो.

योगासन : योगासनांमध्ये पवनमुक्‍तासन, ताडासन आणि भुजंगासन नियमितपणे केल्यास पाय आणि हातांचे स्नायू मजबूत होतात. रक्‍ताभिसरण वाढते आणि सांधेदुखीच्या वेदना कमी होतात.

Back to top button