ममता बॅनर्जी यांना धक्का: प. बंगालमधील हिंसाचाराची सीबीआय चौकशी | पुढारी

ममता बॅनर्जी यांना धक्का: प. बंगालमधील हिंसाचाराची सीबीआय चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगाल निवडणुकीत झालेल्या हिंसाचाराची सीबीआय चौकशी करणार आहे. त्याबाबतचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने आज दिले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हा मोठा झटका मानला जातो.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत हिंसचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

याबाबत राज्य सकार काही करत नाहीत असे आरोपही करण्यात आले होते.

त्यामुळे या विषयाबाबत कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली.

या सुनावणीत कोर्टाच्या निरीक्षणाखाली सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले.

पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी कडवी लढत झाली होती.

या निवडणुकीत राज्य सरकारच्या अखत्यारितील अनेक अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या.

तर ममता बॅनर्जी यांच्या नीकटवर्तीयांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथे भाजपचे पारडे जड राहील अशी अटकळ बांधली जात होती.

मात्र, निवडणूक निकालात ममता बॅनर्जी यांनी सर्वाधिक जागा जिंकत भाजपला मात दिली होती.

या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसचार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. भाजपच्या अनेक नेत्यांच्या वाहनांवर हल्ले झाले होते. तसेच काही कार्यकर्त्यांचा खूनही झाल्याचे आरोप करण्यात आले होते.

ममता बॅनर्जी सत्तेत आल्यानंतर हिंसचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.

ममता बॅनर्जी यांच्याकडे अनेकदा धनकड यांनी पत्र पाठवूनही विचारणा केली होती. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन वेळा पत्र लिहून धनकड यांना हटविण्याची मागणी केली होती.

शपथग्रहन समारंभातच राज्यपालांची विचारणा

भाजपला मात देऊन तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या ममता बॅनर्जी यांना शपथ दिल्यानंतर राज्यपाल धनकड यांनी राज्यातील हिंसाचार रोखण्याबाबत सूचना केली.

यावेळी ममता बॅनर्जी यांनीही त्यांना तेथेच उत्तर देत, मी शपथ घेण्याआधी राज्यात सर्व कारभार निवडणूक आयोगाकडे होता.

त्यामुळे मी त्याला कशी जबाबदार. तुम्ही त्यांना विचारा. कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्याने हा ममता बॅनर्जी यांना धक्का मानला जात आहे.

Back to top button