

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : लागोपाठ झालेल्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षांवर नवे निर्बंध घालण्यात आले असून आता सोबत मोबाईल आणणार्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही. परीक्षेस उशिराने म्हणजे साडेदहानंतर येणार्या विद्यार्थ्यांना परत घरी पाठविण्यात यावे, असे स्पष्ट निर्देशही शिक्षण मंडळाने जारी केले आहेत.
परीक्षेला एक मिनिटही उशिरा येणार्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याच्या निर्णयावर मंडळ ठाम असून आता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर 10.30 वाजता पोहोचावे लागेल.
विलेपार्लेतील परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्राचा पेपर फुटल्यानंतर मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचा काही भाग परीक्षा सुरू झाल्यानंतर एका विद्यार्थिनीच्या मोबाईल व्हॉट्सअॅपवर आढळून आला. मुंबई विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष नितीन उपासनी, सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी विभागातील सर्व केंद्र संचालक व उपकेंद्र संचालकांची ऑनलाईन बैठक घेतली. परीक्षा केंद्रापर्यंत परीक्षार्थी मोबाईल आणतातच कसे, असा महत्त्वाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित झाला.
केंद्रप्रमुखांना परीक्षार्थ्याचे उशिरा येण्याचे कारण सयुक्तिक वाटले तरच कस्टोडियन आणि विभागीय मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची परवानगी घेऊनच परीक्षार्थ्यास प्रवेश देता येईल. मात्र उशिरा आलेल्या परीक्षार्थ्यास परीक्षागृहात अजिबात प्रवेश मिळणार नाही.