

वॉशिंग्टन : पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजे आपला चंद्र. शनी व गुरूसारख्या ग्रहांचे 70 पेक्षाही अधिक चंद्र आहेत. अशा स्थितीत पृथ्वीच्या आकाशात दिसणारा हा चांदोमामा आपला किती लाडका आहे हे सगळेच जाणतात. अशा या चंद्राची कधी काळी पृथ्वीशी धडकही होऊ शकते का, असा प्रश्नही अनेकांना पडतो. मात्र, संशोधकांनी त्याचे उत्तर 'नाही' असे दिले आहे!
ज्यावेळी पृथ्वीची निर्मिती होत होती त्यावेळी तिची 'थिया' नावाच्या एका प्रोटोप्लॅनेटशी धडक झाली. त्यामुळे पृथ्वीचा एक भाग अंतराळात उडाला आणि त्यापासून चंद्राची निर्मिती झाली. हा चंद्र पृथ्वीभोवतीच प्रदक्षिणा काढू लागला. एका अन्य सिद्धांतानुसार दोन अन्य खगोलांच्या धडकेने पृथ्वी आणि चंद्राची निर्मिती झाली. आपापसात धडकणारे हे दोन खगोल आकाराने मंगळापेक्षा पाच पटीने अधिक मोठे होते.
या सिद्धांताला अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ही मानते. पृथ्वीपासून सुमारे 3.85 लाख किलोमीटरवर चंद्र आहे. पृथ्वीच्या तुलनेत त्याचा आकार एक चतुर्थांश इतका आहे. चंद्राचा पृष्ठभाग ठोस असून त्यावर अनेक विवरे किंवा खड्डे आहेत. अनेक लघुग्रह किंवा उल्कांच्या कोसळण्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग असा बनला आहे. कॅलिफोर्नियातील 'नासा'च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधील 'सेंटर फॉर निअर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज' ही संस्था पृथ्वीच्या आसपास फिरणार्या किंवा जवळून जाणार्या खगोलांकडे लक्ष ठेवते.
पृथ्वीसाठी कोणता लघुग्रह किंवा धूमकेतू धोकादायक आहे हे हीच संस्था ठरवते. या संस्थेने पृथ्वीच्या 19.45 कोटी किलोमीटरच्या रेंजमध्ये फिरणार्या 28 हजार 'निअर अर्थ ऑब्जेक्टस्'चा छडा लावलेला आहे. या संस्थेचे मॅनेजर पॉल चोडस् यांनी म्हटले आहे की अशा खगोलांची पृथ्वीशी धडक होऊ शकते की नाही याचा अंदाज घेता येऊ शकतो. त्यानुसार चंद्र आणि पृथ्वीची कधीही धडक होणार नाही. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती अतिशय मजबूत आहे, हे त्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे.
गुरुत्वाकर्षण शक्ती अनेक वेळा धक्काही देत असते, तिच्यामध्ये केवळ खेचून घेण्याचीच शक्ती असते असे नाही. जर ही शक्ती केवळ खेचूनच घेत असती तर यापूर्वीच चंद्र पृथ्वीकडे खेचला जाऊन पृथ्वीला धडकला असता. याच गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावाने चंद्र विशिष्ट कक्षेत स्थिर आहे आणि पृथ्वीभोवती भ—मण करीत आहे. जर भविष्यात त्याच्याच आकाराचा एखादा खगोल त्याला धडकला तरच तो या कक्षेतून हलेल!