

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, बाबा रे तुला काय बोलायचं असेल तर पुराव्यानिशी बोल. बेछूटपणे काही आरोप करू नकोस. खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर. नाही तर आज तुला नोटीस देणार आहेच. हे माझं ठरेललं आहे, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
पडळकरांवर ५० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. नागपुरात एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना वडेट्टीवार यांनी पडळकराना हा खणखणीत इशारा दिला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाणार. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं त्यांनी म्हटले.
पडळकर यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे, आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल. माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दुकानं नाही. छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असं आव्हानच त्यांनी दिलं. वारंवार माझ्या शिक्षणावर प्रश्न निर्माण केले जातात. पण इयत्ता सातवीपर्यंत शिकलेला चंद्रपुरातील एक माणूस केंद्रात मंत्री होता हे वडेट्टीवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, माझ्या आईने कष्ट करुन मला शिकवलं. संघर्षातून मी शिकलो. चळवळीतून घडलो. ओबीसी चळवळीला बदनाम करण्याचं काम पडळकर करतात. सुपारी घेऊन चळवळ संपवण्याचं काम ते करत आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले.
पडळकर खरंच ओबीसींसाठी काम करणार असेल तर त्यांनी सोबत यावं. चंद्रशेखर बावनकुळे कधीही पातळी सोडून बोलत नाहीत. ओबीसींचं नुकसान होणार नाही ही माझी आणि बावनकुळेंची भूमिका आहे, असं सांगतानाच भाजपमध्ये जाणार नाही असं कुलदैवताची शपथ घेऊन पडळकर भर सभेत बोलले होते. त्याचं काय झालं?, असा सवालही त्यांनी केला.