सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा : नितीन राऊत

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा : नितीन राऊत
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केली.

गणेशोत्सव पर्व शांततेत पार पडावा, यासाठी नागपुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पोलिस जिमखाना येथे पार पडली. नागपूर शहरातील सर्व पोलीस झोनमध्ये आभासी पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, अतिरिक्त पोलीस आयुक्त अस्वती दोरजे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. प्रामुख्याने उपस्थित होते. तर बैठकीला आभासी पद्धतीने खासदार डॉ. विकास महात्मे व आमदार विकास ठाकरे देखील हजर होते.

डॉ. नितीन राऊत म्हणाले, सार्वजनिक गणेश मंडळांना अखंडीतपणे वीज पुरवठा मिळणार आहे. काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो दूर करण्यासाठी वीज मंडळाचे कर्मचारी तत्पर राहतील. सार्वजनिक गणेश मंडळे या काळात तात्पुरता वीज पुरवठा घेतात. गणेशोत्सव काळात वापरलेल्या विजेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज दर आकारला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

कोरोनाचे संकट टळलेले नसल्याचे स्पष्ट करून डॉ. राऊत म्हणाले, डेल्टा प्लस वेरीएंटचा शिरकाव शहरात झालेला आहे. पुढील १५ दिवस धोक्याचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही स्थिती विचारात घेऊन गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक सुरक्षेच्या उपाययोजना आखल्या पाहिजेत व राज्य सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मंडळ नोंदणीची प्रक्रिया सुलभ करावी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, अशी सूचना करून डॉ. राऊत म्हणाले, अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या गणेशोत्सव मंडळांनी केवळ नूतनीकरणाचा अर्ज भरून नोंदणी करावी. गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक मदतीचे उपक्रम राबवावे. कोरोना काळात अनेक मुले अनाथ झाली आहेत. या अनाथांना मदत करण्याचे आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी केले.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार विकास ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गणेश मंडळांना विधायक सूचना केल्या. या बैठकीत अनेक गणेशोत्सव मंडळ व शांतता समितीच्या सदस्यांनी विविध प्रश्नांचे शंका निरसन केले.

माजी आमदार प्रकाश गजभिये, संजय भिलकर, अरविंदकुमार लोधी यांनी देखील विविध सूचना केल्या. या बैठकीचे संचालन पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी तर आभार उपायुक्त संदीप पखाले यांनी मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news