कोरोना : केरळच्या ओणमचा धडा महाराष्ट्र घेणार का?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

ओणमनंतर केरळ राज्याला लागलेल्या ठेचीनंतर महाराष्ट्र शहाणा होणे अपेक्षित आहे. त्या राज्यात वाढलेली कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता येत्या गणेशोत्सवासाठी आपण कोणता धडा घेणार?

कोरोना व्हायरसची साथ पृथ्वीवर सुरू झाली, त्याला जवळपास दीड वर्ष झाले आहे. या काळात जगभरातल्या वेगवेगळ्या देशांच्या अनुभवातून एकच निष्कर्ष निघाला तो म्हणजे गर्दीने होते सर्दी. सर्दी होते तशाच प्रकारचा कोरोना हा विषाणू आहे आणि त्याला ताब्यात, काबूत ठेवणे अवघड निश्‍चितच नाही; मात्र इटली असो की अमेरिका, फ्रान्स असो की जर्मनी, खेळांचे सामने, उत्सव-सण-उरूसांना गर्दी करण्याचा मोह आवरता न आल्याने तो विषाणू वेगाने फैलावल्याचे दिसून येते.

गेल्या वर्षीच्या इतिहासात जायची गरज नाही. अगदी दहा दिवसांपूर्वी साजर्‍या झालेल्या ओणम या केरळातील सणाचे उदाहरण घेऊ. गेल्या वर्षीच्या ओणम सणानंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली होती. तसाच अनुभव याही वर्षी आला. केरळात या वर्षीच्या 20 मे रोजी सर्वाधिक 30 हजार 491 रुग्ण आढळले. त्यानंतर ही संख्या कमी होत जाऊन 27 जूनला केवळ आठ हजार 63 रुग्ण होते. जुलैमध्ये कधी 14 हजार, तर कधी 17 हजार, तर ऑगस्टमध्ये रोज 20 हजार रुग्ण सापडू लागले. ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात ओणमची तयारी सुरू झाली. बाजारपेठेत गर्दी उसळली. 21 ऑगस्टला ओणम झाला आणि 28 ऑगस्टला केरळमधील कोरोनाग्रस्तांची संख्या गेली 31 हजार 265 वर. देशात त्या दिवशी 46 हजार 759 रुग्ण आढळले होते.

महाराष्ट्रात गणेशोत्सव गेल्या वर्षी सुरू झाला 22 ऑगस्टला. तेव्हा ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात 81 हजार रुग्ण नोंदले गेले होते, तर संपूर्ण महिन्याचा आकडा तीन लाख 60 हजार होता. सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्या पाच लाख 76 हजार 140 एवढी वाढली. म्हणजेच एका महिन्यात रुग्णसंख्या 2 लाख 16 हजारांनी वाढली. दुसर्‍या लाटेचा तो परमोच्च बिंदू होता. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव तूर्त आटोक्यात असला, तरी रोज साडेतीन हजार रुग्ण सापडत आहेत. आता सणांचा हंगाम सुरू होत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी 30 ऑगस्टला झाली, 3 ते 10 सप्टेंबरदरम्यान पर्युषण पर्व, त्यानंतर 10 ते 19 सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव आहे. नंतर नवरात्र-दसरा आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळी येईल. या काळात पुन्हा गेल्या वर्षीची पुनरावृत्ती हवी आहे काय, असा प्रश्‍न आहे. कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येऊन तिचा परमोच्च बिंदू ऑक्टोबरमध्ये गाठला जाईल, असा अंदाज आहे. काहींच्या मते तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा किमान दीडपट अधिक रुग्णसंख्या घेऊन येईल, तर काहींच्या मते ती दुसर्‍या लाटेच्या तुलनेत फारशी गंभीर नसेल. ही लाट नोव्हेंबर-डिसेंबमध्ये येऊ शकेल, असेही काही तज्ज्ञ सांगतात. ही मतमतांतरे बाजूला ठेवून किमान येणार्‍या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलता येणार नाही का?

उत्सव साजरे करताना विवेकाचे भान आपल्याला ठेवता येणार नाही का? सणांसाठी खरेदी करताना बाजारपेठेत एकाच वेळी गर्दी टाळता येईल. दुकानांमध्ये एका वेळी किती ग्राहक जाऊ द्यायचे, याबाबत नियमावलीचे पालन करता येईल. अनेक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या वर्षी ऑनलाईन गणेशोत्सव साजरा केला. अनेक उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, व्याख्याने, गायन-नृत्य लोकांपर्यंत पोहोचवले. त्यात या वर्षी आणखी अनेक मंडळांची भर पडल्याचे दिसते. पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळाचा शारदा-गणेश, मुंबईचा लालबागचा राजा यांचे ऑनलाईन दर्शन घेऊन गर्दी टाळणे भाविकांना शक्य आहे. मास्क लावणे, गर्दी न करणे, योग्य वेळी चाचणी करून घेणे ही त्रिसूत्री पाळली अन् महाराष्ट्रजन सावधगिरीने वागले, तर रुग्णसंख्येचा आकडा निश्‍चितच आटोक्यात राहील. अन्यथा तिसर्‍या लाटेच्या भयावह रौद्ररूपाला आपल्यालाच सामोरे जावे लागेल. म्हणूनच ओणमनंतर केरळला लागलेल्या ठेचीनंतर महाराष्ट्र शहाणा होणे अपेक्षित आहे आणि गणराया तशी बुद्धी निश्‍चितच देवो, अशी सदिच्छा व्यक्‍त करण्याशिवाय दुसरे गत्यंतर नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news