

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांचे बोगस नियुक्ती प्रकरण समोर आले असून, सरकारची दिशाभूल करून पदावर राहणार्या तायडे यांच्यावर कारवाई करण्याचे ओदश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
तायडे यांच्यामार्फत लाखो कामगारांचे हित डावलून झालेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद आमदार सुनिल प्रभु यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेस उत्तर पाठवताना तत्कालीन कामगार सचिव राजेश कुमार यांनी महेंद्र तायडे बोगस नियुक्ती प्रकरणी जेष्ठ उपसचिवांमार्फत चौकशी झाली असून तायडे यांची नियुक्ती नियमित असल्याची खोटी माहिती दिली होती.
आमदार प्रभु यांनी पाठपुरावा केला असता तायडे यांच्या बोगस नियुक्ती प्रकरणी कोणतीही चौकशी झाली नसल्याचे समोर आले. आ. प्रभु यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देवून तायडे बोगस नियुक्ती प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार मुश्रीफ यांनी विद्यमान कामगार सचिव विनीता वेद सिंघल यांना तायडे यांच्यावर त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. सिंघल तायडे आता कधी कारवाई करतात याकडे अवघ्या कामगार विश्वाचे लक्ष लागले आहे.
* मंडळ प्रशासनाने कल्याण निधी निरीक्षक पदासाठी समाज कल्याण विभागाकडून उमेदवार यादी मागवली. मात्र, 5 पैकी 4 उमेदवार मुलाखतीसाठी अनुपस्थित
* एकट्या तायडे यांची मुलाखत घेऊन तायडे यांना नेमणूक देण्यात आली.
* नेमणूक कल्याण निधी निरीक्षक पदासाठी असताना तायडे यांची वरिष्ठ कल्याण निधी निरीक्षक पदावर नेमणूक
* तायडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप असताना वादग्रस्त तायडे यांना विद्यमान सचिव विनिता वेद सिंघल यांनीही राज्याचे प्रभारी उपकल्याण आयुक्तपद बहाल केले
* तायडे यांना तत्कालीन कामगार सचिव राजेश कुमार यांनी कल्याण आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार दिल्यानंतर दोन वर्षांत मंडळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. एन.आय.टी, नागपूर प्रकल्प कामगार हिताचा नसताना तायडे यांनी प्रकल्पास 10 कोटी रुपये अदा केले.
* गृहमंत्री आणि गृह राज्यमंत्री यांच्या निर्देशानुसार महेंद्र तायडे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अपसंपदेची लाचलुचपत विभागाकडून उघड चौकशीदेखील
प्रलंबित आहे.