

पुढारी ऑनलाईन: ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा कंपनी Zomato ने आता 10 मिनिटांत तुमच्यापर्यंत अन्न पोहोचवण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे संस्थापक दीपंदर गोयल यांनी या सेवेला Zomato Insta असे नाव दिले आहे. पुढील महिन्यापासून ही सेवाही सुरू होणार आहे. या घोषणांनंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला. महाराष्ट्रातही आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, 'डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची झोमॅटोची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीनं डिलिव्हरी बॉयच्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे.' त्यानंतर दीपंदर यांनी डिलिव्हरी बॉयला प्रशिक्षण आणि विमा देण्यात येईल असे देखील सांगितले आहे.
दीपंदर यांनी सोशल मीडियावर 10 मिनिटांत अन्न तयार करून डिलिव्हरी करण्याची योजनाही शेअर केली. यामध्ये जलद वितरण हे पूर्णतः फूड नेटवर्कवर अवलंबून असेल. हे नेटवर्क जास्त मागणी असलेल्या ग्राहकांच्या जवळ स्थित असेल. यासाठी डिश-लेव्हल डिमांड प्रेडिक्शन अल्गोरिदम आणि इन-स्टेशन रोबोटिक्स यासारख्या तांत्रिक गोष्टींची मदत घेतली जाणार आहे.
दीपंदर यांनी असेही सांगितले की, केवळ निवडक सेवा 10 मिनिटांसाठी उपलब्ध असतील. या सेवेअंतर्गत फक्त जवळची ठिकाणे आणि निवडक खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. या मेनूमध्ये तुम्ही ब्रेड ऑम्लेट, पोहे, कॉफी, चहा, बिर्याणी, मोमोज, मॅगी असे पदार्थ ऑर्डर करू शकता. 10 मिनिटांत सेवा देण्यासाठी नवीन फूड स्टेशन तयार केले जात आहेत.
जलद वितरणासाठी आम्ही डिलिव्हरी पार्टनरवर कोणताही दबाव टाकत नाही, असेही दीपंदर यांनी सांगितले. तसेच वितरणासाठी उशीर झाल्यास आम्ही कोणताही दंड आकारत नाही. आम्ही कोणाचाही जीव धोक्यात घालत नाही. आम्ही आमच्या वितरण भागीदारांना रस्ते सुरक्षेबद्दल शिक्षित करत आहोत आणि अपघात आणि जीवन विमा देखील देत आहोत.
दीपिंदर गोयल यांनी आपल्या ब्लॉगवर लिहले आहे की, मला असे वाटू लागले होते की झोमॅटोचा 30 मिनिटांचा सरासरी वितरण वेळ खूप मंद आहे. तो लवकरच आपल्याला व्यवसायाबाहेर जाईल. जर आपण ते बदलले नाही तर कोणीतरी हे काम करेल. तंत्रज्ञान उद्योगात टिकून राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नाविन्य आणणे आणि वाढणे होय. म्हणूनच आता आम्ही आमची 10 मिनिटांची फूड डिलिव्हरी ऑफर घेऊन आलो आहोत.