

दुबई; वृत्तसंस्था : आयसीसीच्या ताज्या मानांकन यादीत कसोटी फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड व मार्नस लॅबुशेन यांनी पहिल्या तीन क्रमांकांवर कब्जा केला असून यामुळे 1984 नंतर प्रथमच असा पराक्रम गाजवला गेला आहे. यापूर्वी ओव्हलवर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनल लढतीत स्टीव्ह स्मिथ व ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमक शतके झळकावली होती. त्याचे प्रतिबिंब या मानांकनात उमटले आहे. (WTC Final 2023)
लॅबुशेन 903 रेटिंग पॉईंटसह अव्वलस्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला असून स्मिथ दुसर्या स्थानी झेपावला आहे. त्याने भारताविरुद्ध अंतिम लढतीत अनुक्रमे 121 व 34 धावांचे लक्षवेधी योगदान दिले होते. त्या लढतीतील सामनावीर ट्रॅव्हिस हेडने अनुक्रमे 163 व 18 धावांची खेळी साकारली. या कामगिरीमुळे तो कारकिर्दीतील सर्वोत्तम तिसर्या स्थानी पोहोचण्यात यशस्वी ठरला. दुसर्या स्थानासाठी स्मिथ, हेड व केन विल्यम्सन यांच्यात बरीच रस्सीखेच होती. स्मिथने 885, हेडने 884 व विल्यम्सनने 883 रेटिंग पॉईंट मिळवले. (WTC Final 2023)
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 209 धावांनी विजय मिळवला, त्यात लक्षवेधी योगदान देणार्या अन्य खेळाडूंचे मानांकनही ताज्या यादीत वधारले आहे. भारताविरुद्ध अनुक्रमे 48 व नाबाद 66 धावांची खेळी साकारणारा अॅलेक्स कॅरे आता 36 व्या स्थानी झेपावला. नॅथन लियॉन सहाव्या तर स्कॉट बोलँड 36 व्या स्थानी पोहोचले आहेत. बोलँड व लियॉन यांनी त्या लढतीत प्रत्येकी 5 बळी घेतले होते.
भारतीय संघातर्फे 89 व 46 धावांची लक्षवेधी खेळी साकारणारा अजिंक्य रहाणे 37 व्या स्थानी पोहोचला असून पहिल्या डावातील अर्धशतकवीर शार्दूल ठाकूर 94 व्या स्थानी पोहोचला आहे.
एकाच संघाच्या तिन्ही फलंदाजांनी जागतिक मानांकनातील पहिल्या तीन क्रमांकावर विराजमान होण्याची ही 1984 नंतरची पहिलीच वेळ ठरली आहे. यापूर्वी 1984 मध्ये विंडीजच्या खेळाडूंनी असा पराक्रम केला होता. त्यावेळी गॉर्डन ग्रिनीज 810 रेटिंग पॉईंट, क्लाईव्ह लॉईड 787 व लॅरी गोम्स 773 अव्वलस्थानी विराजमान होते.
मागील सहा महिन्यात मैदानापासून दूर असला तरी ऋषभ पंत आताही आयसीसी क्रमवारीतील सर्वोच्च मानांकित भारतीय ठरला आहे. ऋषभच्या खात्यावर 758 रेटिंग पॉईंट असून तो दहाव्या स्थानी विराजमान आहे. दरम्यान, पुरुष वन डे मानांकनात युएईचा अरविंद 49 व्या स्थानी पोहोचला आहे. लंकन खेळाडू पथूम निसांका फलंदाजांमध्ये 62 व्या तर वानिंदू हसरंगा गोलंदाजांमध्ये 28 व्या स्थानी आहेत.
हेही वाचा;