wtc championship 2023 : इंग्लंडमध्ये कोण ठरणार सरस? भारत-ऑस्ट्रेलिया लढत शक्य

wtc championship 2023 : इंग्लंडमध्ये कोण ठरणार सरस? भारत-ऑस्ट्रेलिया लढत शक्य
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले 2 कसोटी सामने जिंकून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर कब्जा केला आहे. तरीही चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये कांगारू अजून पहिल्या स्थानी तर भारतीय संघ दुसर्‍या क्रमांकावर आहे. (wtc championship 2023)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये जर कोणतीही मोठी उलथापालथ झाली नाही, तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासूनच होऊ शकतो. भारतीय संघ पहिल्या सत्राच्या न्यूझीलंडकडून अंतिम फेरीत पराभूत झाला होता. (wtc championship 2023)

भारत व ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 किंवा जास्त देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत 13 वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हे सर्व सामने वन डे प्रारूपातील आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 9 तर टीम इंडियाने केवळ 4 सामने जिंकले आहेत. (wtc championship 2023)

शारजाह येथे 1985 मध्ये झालेल्या फोर नेशन्स चषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला अंतिम सामना रंगला होता. हा सामना भारतीय संघाने जिंकून जेतेपद पटकावले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 139 धावा केल्या होत्या. रवी शास्त्री, मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी 2-2 विकेट घेतल्या होत्या, तर कर्णधार कपिल देवनेही एक विकेट घेतली होती. (wtc championship 2023)

भारतीय संघालाही टार्गेट पूर्ण करताना घाम फुटला होता; मात्र मोहिंदर अमरनाथने नाबाद 24 धावा करत विजय साकारला. भारताने 39.2 षटकांत 7 गडी गमावून टार्गेट पार केले होते. टीम इंडियाच्या वतीने वेंगसरकरने 35, अझरुद्दीनने 22, गावसकरने 20 धावा केल्या.

त्यानंतर पुढील पाच फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाचा पराभव केला. यामध्ये कांगारूंनी आपल्या देशात 4 फायनल जिंकल्या. दरम्यान, 1998 मध्ये मायदेशात खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीतही भारतीय संघ कांगारू संघाकडून पराभूत झाला होता. दिल्लीतील अंतिम सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ 227 धावा करू शकला. अजय जडेजाने सर्वाधिक 48 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डॅमियन फ्लेमिंगने 3 तर मायकेल कॅस्प्रोविच आणि स्टीव्ह वॉने 2-2 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 49 व्या षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. मायकेल बेवनने नाबाद 75 धावा केल्या. कर्णधार स्टीव्ह वॉनेही 57 धावांची उत्कृष्ट खेळी केली.

1998 मध्ये शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या कोका-कोला चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने बदला घेतला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 272 धावा केल्या. तर भारताने सचिन तेंडुलकरच्या 134 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर 49 व्या षटकात लक्ष्य गाठले. कर्णधार अझरुद्दीननेही 58 धावा केल्या.

2003 मध्ये वन-डे वर्ल्डकप विश्वचषक स्पर्धेच्या फायनलसह 2 विजेतेपदाच्या सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाने मायदेशात भारताला दोनदा अंतिम फेरीत पराभूत केले होते, पण भारतीय संघाने 2008 मध्ये त्याचा बदला घेतला आणि ऑस्ट्रेलियाने 2 फायनल जिंकल्या. 2 मार्च 2008 रोजी, भारताने कॉमनवेल्थ बँक मालिकेच्या पहिल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव केला. या सामन्यात तेंडुलकरने 117 धावांची शतकी खेळी साकारली होती. विद्यमान कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने महत्त्वपूर्ण 66 धावा केल्या.

भारतीय संघाने 4 मार्च 2008 रोजी दुसर्‍या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 9 धावांनी पराभव केला. त्यानंतर आतापर्यंत दोघांमध्ये विजेतेपदाचा एकही सामना झालेला नाही. या सामन्यात भारताने 9 विकेट गमावत 258 धावा केल्या होत्या. तेंडुलकरने 91 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 249 धावांवर गारद झाला. या लढतील प्रवीण कुमारने 4 विकेटस् घेतल्या होत्या.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news