

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आज झालेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकात 113 धावा केल्या होत्या. आरसीबीने 19.3 षटकांत दोन गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. (WPL 2024)
आरसीबीचे स्पर्धेतील हे पहिले विजेतेपद आहे. बंगळुरूच्या पुरुष संघाने कधीही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. परंतु महिला संघाने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या हंगमात जेते पदाला गवसणी घातली. दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सोफी डिव्हाईन आणि स्मृती मानधना यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागिदारी केली. दिल्लीच्या शिखा पांडेने 32 धावा करणाऱ्या डिव्हाईनला बाद करून ही भागीदारी मोडली. यानंतर कर्णधार मानधनाने डावाची धुरा सांभाळली, मात्र मिन्नू मणीने तिला 31 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर एलिस पेरी आणि रिचा घोष यांनी अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.
(WPL 2024)
WPLचा अंतिम सामना अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात बंगळूरूच्या श्रेयंका पाटील आणि मोलिनक्सच्या शानदार गोलंदाजीमुळे आरसीबीने दिल्लीचा डाव 18.3 षटकांत 113 धावांत आटोपला. (WPL 2024)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीच्या संघाला शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळ करत आरसीबीच्या गोलंदाजांवर दडपण आणले, मात्र आठवे षटक टाकण्यासाठी आलेली फिरकी गोलंदाज मोलिनक्सने या षटकात शेफाली, कॅप्सी आणि जेमिमाला बाद करून दिल्लीचा डाव खिळखिळा केला.
यानंतर श्रेयंका पाटीलने दिल्लीच्या फलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही. दिल्लीची फलंदाजी इतकी खराब झाली होती की, एकेकाळी बिनबाद 64 धावा करणारा संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 113 धावांवर बाद झाला. आरसीबीतर्फे श्रेयंका पाटीलने चार, मोलिनक्सने तीन आणि आशाने दोन गडी बाद केले. विशेष म्हणजे आरसीबीच्या फिरकीपटूंनी नऊ विकेट घेतल्या तर राधा यादव धावबाद झाली.(WPL)
हेही वाचा :