Saudi Arab Nouf Marwaai : प्रिंस सलमान यांच्या आदेशानुसार नौफ मारवाई यांचा अरब देशात योगाचा प्रसार

Saudi Arab Nouf Marwaai : प्रिंस सलमान यांच्या आदेशानुसार नौफ मारवाई यांचा अरब देशात योगाचा प्रसार
Published on
Updated on

जेद्दाह (सौदी अरेबिया); पुढारी ऑनलाईन : भारताने अवघ्या जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले आहे. म्हणूनच आता आतंरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा केला जातो. पण, भारतात अजून काही लोक योगाला तितके महत्त्व देत नाहित किंवा त्याचा विरोध करताना दिसून येतात. पण, आपण ज्यांना कर्मठ, धर्मांध म्हणतो, अशा मुस्लीम अरब देशांना सुद्धा योगाचे महत्त्व पटले आहे. सौदी अरेबियाने योगाचे महत्त्व झपाट्याने ओळखून योगाचा प्रसार केवळ सौदी अरेबियातच नव्हे तर संपूर्ण अरब देशांमध्ये करण्याचा प्रयत्न सुरु केला असून या कार्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे. योगाचा प्रसार करणाऱ्या नौफ मारवाई यांची सौदी अरेबियातील पहिल्या महिला योग प्रशिक्षक म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर अरब जगतात योगाचे महत्त्व पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. (Saudi Arab Nouf Marwaai)

अरब देशांमध्ये योगाचा प्रसार (Saudi Arab Nouf Marwaai)

सौदी अरेबियाच्या क्रीडा मंत्रालयाने जेद्दाहमध्ये योग शिबीराचे आयोजन केले आहे. हे शिबीर २२ डिसेंबरपासून सुरू झाले आहे आणि ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 'अरब युथ एम्पॉवरमेंट प्रोग्राम'च्या बॅनरखाली योग कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे. या शिबीरात ११ अरब देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. (Saudi Arab Nouf Marwaai)

या अरब देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती, ओमान, येमेन, पॅलेस्टाईन, इजिप्त, लिबिया, अलेग्रिया, मोरोक्को, ट्युनिशिया आणि मॉरिटानिया यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मानवी जीवनात योगाचे महत्त्व पोहोचवणे, अरब देशांमधील क्रीडा, सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या विकासाला चालना देणे आणि अरब युवा शिष्टमंडळांना या क्षेत्रांमध्ये जागरूक करणे हा आहे. सौदीच्या क्राऊन प्रिन्स यांनी योगाला लोकांच्या जीवनात पोहचविण्याची जबाबदारी नौफ मारवाई यांच्यावर सोपवली असून नौफ त्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. (Saudi Arab Nouf Marwaai)

नौफ मारवाई यांचा पद्मश्री सन्मानाने गौरव

सौदी अरेबियातील रहिवासी असलेल्या नौफ मारवाई यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे आणि सौदी अरेबियातील त्या पहिल्या प्रमाणित योग शिक्षक आहेत. त्या सौदी अरेबिया योग समितीचे अध्यक्ष देखील आहेत. भारतीय वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना नौफ मारवाई म्हणाल्या, "माझी इच्छा आहे की, प्रत्येकाने त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी योगाभ्यासात प्रवेश घ्यावा." त्या पुढे म्हणाल्या, "आजच्या जीवनात, जागतिक आव्हाने पेलताना योगाची गरज आहे, जो राष्ट्रांमध्ये शांतीचा संदेश देऊ शकेल". मारवाई पुढे म्हणतात, "आमच्या अरब बंधू-भगिनींना या सुंदर कलेची ओळख करून देण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी क्रीडा मंत्रालयाचे आभार मानते, त्यांच्या आरोग्यासाठी आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आम्ही खूप चांगले काम केले आहे.

नौफ मारवाई होत्या गंभीर आजाराने ग्रस्त

नौफ मारवाई लहानपणापासून ल्युपस (ऑटोइम्यून संधिवाताचा रोग) सारख्या आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांनी योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून या आजारावर विजय मिळवला आहे. त्या म्हणाल्या, 'मला लहानपणापासून या आजाराने ग्रासले होते, मात्र योग आणि आयुर्वेदिक जीवनशैलीमुळे माझे आयुष्य बदलले.' नौफ म्हणाल्या, "प्रत्येकाला योगासने उपलब्ध व्हावीत, मग ते कोणत्याही आजाराने त्रस्त असोत किंवा पूर्णपणे निरोगी असोत, जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मला वाटते."

योगाने नौफ यांचे जीवन कसे बदलले?

नौफ मारवाई म्हणतात,"मला वयाच्या १७ व्या वर्षी या आजाराचे निदान झाले होते आणि त्यानंतर मी योग आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यास सुरुवात केला. त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप सुधारणा होऊ लागली आणि हे आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय होते. माझ्या शरीराच्या कोणत्याही भागाला इजा झाली नाही आणि मी खूप चांगले जीवन जगत आहे. सौदी सरकारने योगास प्रोत्साहन देण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, ज्याचा उद्देश योगाची संस्कृती तिचे सर्व प्रकारांचा प्रसार करणे एवढाच आहे.

योगासाठी सौदी अरेबियाचा पुढाकार

सौदी योग समितीची मे 2021मध्ये स्थापना झाली. तेव्हापासून संपूर्ण देशात आरोग्य आणि कल्याणासाठी योगास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या कार्याने इतर अरब देशांचे लक्ष वेधले. या महिन्याच्या सुरुवातीला जेद्दाह येथे पहिला सौदी योग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जो 7 दिवस चालला होता. युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजीने देखील या कार्यक्रमात भाग घेतला होता, ज्यामध्ये योगामध्ये पारंगत ११२ हून अधिक नोंदणीकृत डॉक्टरांनी सहभाग घेतला. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे योग कार्यक्रमातील ९५ लोकांपैकी बहुतांश मुली होत्या. यासोबतच योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप जेद्दाह येथे आयोजित करण्यात आली होती, ही अरब जगतातील पहिलीच स्पर्धा होती. कार्यक्रमात विविध वयोगटातील लोकांचा सक्रिय सहभाग दिसून आला.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news