लंडन ः केवळ सरडेच रंग बदलण्यात पटाईत असतात असे नाही. ऑक्टोपस, स्क्वीडसारखे जलचरही क्षणार्धात रंग बदलू शकतात. अशाच एका स्क्वीडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या स्क्वीडला 'ग्लास स्क्वीड' असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे पाण्याबाहेर काढताच हा काळ्या रंगाचा स्क्वीड तत्काळ रंगहीन व पारदर्शक बनतो. पाण्यात सोडताच तो पुन्हा काळ्या रंगाचा बनतो.
या व्हिडीओमध्ये दिसते की एक व्यक्ती टबमधील या काळ्या रंगाच्या स्क्वीडला पाण्याबाहेर काढते. त्यावेळी तत्काळ या स्क्वीडचा रंग बदलतो व तो पारदर्शक होतो. अगदी काचेसारखा पारदर्शक बनलेल्या या स्क्वीडचे शरीरांतर्गत असलेले अवयवही दिसू लागतात. इतकेच नव्हे तर त्याला पकडणार्या माणसाच्या हाताची बोटेही आरपार दिसतात.
स्क्वीडला पाण्यात सोडताच तो पुन्हा एकदा मूळ रूपात येतो. एका व्यक्तीने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तो आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून 48 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. समुद्रात खोल पाण्यात असे 'ग्लास स्क्वीड' असतात. ते त्यांच्या त्वचेत काळ्या रंगाची शाई सोडतात. त्यामुळे त्यांचा रंग बदलतो. त्यांचे हे रंग बदलण्याचे कसब त्यांना शिकार्यांपासून दूर ठेवते. विशेष म्हणजे हे जलचर त्यांचा आकारही बदलू शकतात.