शिकागो : सध्या शब्दकोड्यांचा एक प्रकार असणारा 'वर्डल' नावाचा एक गेम जगभर व्हायरल होत आहे. यामध्ये रोज एकच कोडे येते व शब्द ओळखण्यासाठी जास्तीत जास्त सहा संधी मिळतात. कोणतीही 'हिंट' नसताना पाच अक्षरांचा शब्द ओळखणे तसेच कठीणच असते. त्यामुळेही शब्द ओळखला की लोक लगेच आपला स्कोअर सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच शब्दकोड्यामुळे अमेरिकेतील एका मुलीने प्रसंगावधान राखून आपल्या आईचा जीव वाचवला आहे.
या तरुणीची आई डेन्स हॉल्ट त्यांच्या घरी एकट्याच राहतात. त्या झोपलेल्या असताना अचानक घराच्या खिडकीतून एक माणूस आत घुसला आणि त्याने तब्बल सतरा तास या आजीबाईंना तळघरात कोंडून ठेवले. डेन्स यांची मुलगी मेरेडिथ ही सियाटलला राहते. माय-लेकींना रोज सकाळी वर्डल गेम खेळण्याची सवय होती. एके दिवशी ज्यावेळी मेरेडिथच्या आईने वर्डलचा स्कोअर शेअर केला नाही त्यावेळी तिला चिंता वाटू लागली. सियाटल आणि शिकागोमधील अंतर 1700 मैलांचे आहे. त्यामुळे तत्काळ जाऊन आईला भेटता येणार नव्हते. तिने आईला मेसेज केला; पण मेसेज पाहिला जाऊनही त्यावर काहीही उत्तर येत नव्हते. त्यामुळे तिने पोलिसांना या गोष्टीची कल्पना दिली. पोलिसांनी वेळीच डेन्स यांचे घर शोधून तिथे प्रवेश केला आणि त्या 80 वर्षांच्या वृद्ध महिलेचा जीव वाचवला. घरात घुसलेला माणूस एक माथेफिरू होता आणि तो दोन कात्र्या घेऊन घुसला होता. त्याने या महिलेस घरभर ओढत नेऊन तिला तळघरात कोंडून ठेवले होते. पोलिस आल्यावर त्यांनी डेन्स यांची सुटका केली.