

आर्कनी : या जगात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. विशेषत: महासागरांमध्ये तर अनेक रहस्ये दडलेली आहेत. यामध्ये हिमखंडांचादेखील आवर्जून समावेश होतो. ए-23-ए हा पृथ्वीवरचा सर्वांत मोठा हिमखंड आहे. तो सध्या दक्षिण महासागरातून हळूहळू जमिनीच्या दिशेने प्रवास करत आहे. हा प्रचंड बर्फाचा तुकडा कुठे जाऊन थांबेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वाटेत ज्या ठिकाणांचा याच्याशी सामना होईल तिथे काय घडेल, याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2018 मध्ये अंटार्क्टिकामधल्या लार्सन सी आइस शेल्फपासून ए-23-ए दूर झाला आहे. तेव्हापासून ए-23-एने दक्षिण महासागरातून एका अनोख्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याचा आकार भारतातल्या हरियाणा राज्याच्या क्षेत्रफळापेक्षा थोडासाच कमी आहे.
जगातल्या सर्वात मोठ्या हिमखंडाच्या आकाराने जगभरातील शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केले आहे. सॅटेलाईटद्वारे केलेल्या मोजणीवरून असे लक्षात आले आहे की, या हिमखंडाची सरासरी जाडी 280 मीटरपेक्षा (920 फूट) जास्त आहे. फ्रान्समधला आयफेल टॉवर यापेक्षा फक्त वीस मीटर उंच आहे. हिमखंडाचे क्षेत्रफळ 3900 चौरस किलोमीटर (1500 चौरस मैल) आहे. हरियाणाचे क्षेत्रफळ 44212 चौरस किमी आहे. बीबीसीच्या इंग्रजी वेबसाईटनुसार, हा हिमखंड अनेक महिन्यांपासून अंटार्क्टिकाच्या अगदी उत्तरेला भटकत आहे. प्रत्यक्षात तो पृथ्वीच्या सर्वांत शक्तिशाली सागरी प्रवाहासोबत फिरणे अपेक्षित आहे.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, गोठलेला ब्लॉक पाण्याच्या एका मोठ्या फिरत्या सिलिंडरच्या वर अडकला गेला आहे. या प्रकाराला समुद्रशास्त्रात ‘टेलर कॉलम’ म्हटले जाते. ध्रुवीय तज्ज्ञ प्रोफेसर मार्क ब्रॅंडन म्हणाले, ‘सहसा आपण हिमनगांना क्षणिक समजतो. त्यांचे तुकडे होतात आणि वितळतात; पण ए-23-एच्या बाबतीत अद्याप तसे झालेले नाही.’ हा हिमखंड 1986 मध्ये अंटार्क्टिक किनारपट्टीपासून दूर झाला होता. नंतर तो जवळच्या वेडेल समुद्राच्या तळाच्या चिखलात अडकला. तीन दशकांपासून तो एक स्थिर ‘आइस आयलंड’ होता. त्याची अजिबात हालचाल झाली नाही. 2020पर्यंत तो तिथे होता; मात्र त्यानंतर तो पुन्हा तरंगू लागला.