

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने आपल्या सॅटेलाईटस्नी टिपलेल्या छायाचित्रांच्या आधारे दावा केला आहे की जगातील सर्वात मोठा 'बर्फाचा डोंगर'च असलेला एक हिमनग आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अंटार्क्टिकावरील 'ए-76ए' एके काळी सर्वात मोठ्या आईसबर्गमध्ये समाविष्ट होता. आता त्याचा केवळ शेवटचा भाग शिल्लक राहिलेला आहे. अमेरिकेच्या 'आइस सेंटर'च्या माहितीनुसार हा हिमनग 135 किलोमीटर लांब आणि 26 किलोमीटर रुंदीचा आहे. लंडन शहरापेक्षा हा आकाराने दुप्पट आहे.
रोडे आयलंडच्या आकाराचा हा बर्फाचा डोंगर 'ए-76'चा सर्वात मोठा हिस्सा आहे. 'ए-76' हा पूर्वी सर्वात मोठा हिमनग मानला जात होता. हा भाग अंटार्क्टिकाच्या रोन्ने आइस शेल्फच्या पश्चिम भागातून मे 2021 मध्ये तुटला. त्यानंतर त्याचे तीन भाग झाले. त्यांना '76 ए', '76बी' आणि '76 सी'अशी नावे देण्यात आली. या सर्वांमध्ये '76 ए' सर्वात मोठा होता. गेल्या एक वर्षापासून तो अंटार्क्टिकाजवळ पाण्यावर हळूहळू तरंगत आहे.
आता मात्र त्याचा वितळण्याचा दर वाढला असून तो पूर्णपणे वितळून जाऊ शकतो. 'ए-76 ए'ची छायाचित्रे गेल्या 31 ऑक्टोबरला 'नासा'च्या टेरा सॅटेलाईटने टिपली होती. हा हिमनग सध्या एलिफंट बेट आणि साऊथ ओर्कने बेट समूहाजवळ दिसत आहे. 'नासा'च्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीने 4 नोव्हेंबरला त्याची नवी छायाचित्रे टिपली आहेत. त्यावरून असे अनुमान काढले जात आहे की तो उत्तरेला आणखी अंतर पुढे सरकेल. 'नासा'ने म्हटले आहे की हा हिमनग म्हणजे सागरी बर्फ नसून तो ग्लेशियरचा तुटलेला भाग किंवा हिमखंड आहे. सागरी बर्फ म्हणजे समुद्राचेच गोठलेले पाणी असते व ते समुद्राच्या पाण्यावर तरंगते. 'ए-76 ए'ने जुलै 2022 पासून 500 किलोमीटरचे अंतर कापले असल्याचेही दिसून आले आहे.