लंडन : एका हिमनगाशी झालेल्या धडकेनेच 'टायटॅनिक'सारखे 'कधीही न बुडणारे जहाज' अशी जाहिरात करून निघालेले भव्य जहाज आपल्या जलप्रवासाच्या सुरुवातीच्या चारच दिवसांमध्ये बुडाले होते! हिमनग समुद्राच्या पाण्याच्या वर जितके दिसते त्यापेक्षा अनेक पटीने पाण्याखाली मोठ्या आकाराचे असते. अशाच प्रकारचा एक हिमनग आता साऊथ जॉर्जिया आयलंडच्या दिशेने सरकत आहे. दक्षिण अटलांटिक महासागरातील या बेटावर पेंग्विनची मोठीच कॉलनी आहे. या बेटाला हा हिमनग धडकला तर तेथील अन्नसाखळीवर विपरित परिणाम होऊ शकतो अशी भीती संशोधकांना आहे.
या हिमनगावर दीर्घकाळापासून संशोधक लक्ष ठेवून आहेत. हा हिमनग साऊथ जॉर्जिया बेटाइतक्याच आकाराचा आहे हे विशेष. जुलै 2017 मध्ये तो अटलांटिक पेनिन्सुलामधून तुटून वेगळा झाला होता व दोन वर्षांच्या काळात तो बराच पुढे सरकत आला आहे. हा पेनिन्सुला जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक फटका बसलेल्या पृथ्वीवरील ठिकाणांपैकी एक आहे. तिथे 9 फेब—ुवारीला विक्रमी 20.75 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. तेथील उष्णतेत होत असलेल्या वाढीमुळे अनेक हिमनद्या वितळत असून हिमनग वेगळे होत आहेत. त्यामुळे जगभरातील समुद्रांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे. तेथीलच 'ए 68 ए' नावाचा हा मोठा हिमनग तुटून आता साऊथ जॉर्जिया आयलंडच्या दिशेने जात आहे. ब्रिटिशांच्या मालकीचे हे दुर्गम बेट दक्षिण अमेरिकेच्या मार्गात आहे. या बेटाला हा हिमनग किती दिवसांमध्ये किंवा आठवड्यांमध्ये धडकेल हे स्पष्ट नाही. अशी धडक झाल्यावर बेटावरील वन्यजीवनाची मोठीच हानी होऊ शकते.