Cryptic Pregnancy : प्रसूती होईपर्यंत ‘तिला’ गरोदर असल्याचे माहीतच नव्हते

२१ वर्षांच्या तरुणीचा धक्कादायक आणि अनोखा अनुभव
Cryptic Pregnancy
Cryptic Pregnancy
Published on
Updated on

वॉशिंग्‍टन : अमेरिकेतील टेक्सास येथे राहणाऱ्या २१ वर्षीय ऑबरी मॉरिस हिने तिच्या आयुष्यातील एका अत्यंत धक्कादायक आणि अकल्पनीय अनुभवाचा खुलासा केला आहे. कोणतीही लक्षणे न दिसल्यामुळे प्रसूती होईपर्यंत तिला स्वतःच्या गरोदरपणाची पुसटशी कल्पनाही नव्हती.

लक्षणे नसलेले गूढ गरोदरपण

ऑबरी कायदेविषयक शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत होती. गरोदरपणाचे कोणतेही संकेत मिळू नयेत यासाठी ती नियमित गर्भनिरोधक गोळ्या घेत होती. तिला कोणतीही मळमळ, थकवा किंवा खाण्याची तीव्र इच्छा झाली नाही. गोळ्या घेत असल्यामुळे तिला दरमहा नियमित रक्तस्राव होत होता. नियमित मासिक पाळी होत असल्‍याने शंका येण्याचे कोणतेही कारण नव्हते. दरम्‍यान, गेल्या काही महिन्यांत तिचे वजन अवघे १० पाऊंड (सुमारे ४.५ किलो) वाढले होते, जे तिने खाण्यापिण्याच्या सवयींमुळे झाले असावे असे मानले. वैद्यकीय भाषेत याला 'क्रिप्टिक प्रेग्‍नन्सी’ म्हणतात.

डॉक्टरांनी स्पष्ट केले की, तिची वार (नाळ) गर्भाशयाच्या पुढील बाजूस असल्यामुळे बाळाची हालचाल आतल्या आतच राहिली आणि ती जाणवू शकली नाही. २० फेब्रुवारीच्या संध्याकाळी ऑबरीला पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. तिला आधी बद्धकोष्ठता किंवा ट्युमर झाल्याचा संशय आला. मात्र, अचानक तीव्र कळा आल्यानंतर ती बेडरूममध्ये गेली. त्‍यानंतर तिने अवघ्‍या काही वेळात एका निरोगी मुलीला जन्म दिला. कोणतीही वैद्यकीय मदत नसताना तिने स्वतः बाळाला हाताळले आणि हेल्‍पलाईनवर फोन करून रुग्णवाहिका मागवली. तिने फोनवरच पती प्रेस्टनला बाळाचा फोटो पाठवून हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास सांगितले.

कुटुंबाचा धक्का आणि स्वीकार

सुरुवातीला ऑबरी आणि तिचा पती प्रेस्टन यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे बाळाला दत्तक देण्याचा विचार केला होता, परंतु नंतर त्यांनी मुलीला स्वतःजवळच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तिचे नाव 'नेव्ही' ठेवले. बाळ ८ दिवसांचे झाल्यानंतर ऑबरीने जेव्हा व्हिडीओ कॉलवर तिच्या आईला बाळ दाखवले, तेव्हा आईचा यावर विश्वासच बसला नाही. शेवटी जेव्हा ऑबरीने हॉस्पिटलचा बँड दाखवला, तेव्हाच आईला हे खरे असल्याचे पटले. प्रसूतीनंतर काही काळ ऑबरीला 'पोस्टपार्टम डिप्रेशन’चा (प्रसूतीनंतरचे किंवा बाळंतपणानंतरचे नैराश्य) सामना करावा लागला. मात्र, आता ती आपल्या मुलीचा सांभाळ करत पुन्हा कॉलेजच्या शिक्षणाकडे वळत आहे. ऑबरी म्हणते, ‘वयाच्या २१ व्या वर्षी आई होणे हे माझ्या नियोजनात नव्हते, पण कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठी आश्चर्यं ही सर्वात मोठे आशीर्वाद ठरतात.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news