

केपटाऊन : सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये सापाचाही समावेश होता. सर्पदंश झाल्यास त्याचे विष शरीरात पसरते आणि मृत्यूही होऊ शकतो. पण एक साप असा आहे, जो दंशातून नाहीतर लाळेतून आपले विष सोडतो. तो इतका धोकादायक आहे की, तुमच्यापासून 9 फूट अंतर दूर असेल आणि त्याने लाळ फेकली तर ते डोळ्यात जाऊन द़ृष्टी जाऊ शकते. झेब्रा स्पिटिंग कोब्रा असे या सापाचे नाव आहे. याचे डोके काळे किंवा तपकिरी असते, त्याचा मानेकडील भागही काळा असतो. त्याच्या पोटावर हलक्या तपकिरी किंवा क्रीम रंगाचे पट्टे असतात. जेव्हा ते लहान असते तेव्हा शरीरावर हलके तपकिरी किंवा काळे आणि पांढरे पट्टे दिसतात. जसजसे ते मोठे होतात तसतसा त्यांचा रंग गडद होत जातो.
तो झेब्रासारखा पट्टेदार दिसतो म्हणून त्याला झेब्रा स्पिटिंग कोब्रा असे नाव देण्यात आले आहे. या कोब्राचा आकार 3.9 फूट ते 4.9 फूट किंवा त्याहून अधिक असतो. डोळे गोलाकार असतात आणि डोक्याच्या दोन्ही बाजूंना फुगवटा असतो, जिथे तो विष साठवतो. झेब्रा स्पिटिंग कोब्रा 9 फूट अंतरावरून विष थुंकतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो फक्त डोळ्यात बघून थुंकतो. चावल्यानेही त्याचे विष एखाद्याच्या शरीरात पसरू शकते. आता हा साप आढळतो कुठे? तर नामिबिया, अंगोला आणि दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात हा साप आढळतो. अफ्रिकन जंगलात ते रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना दिसतात. त्याचे आयुष्य 12 वर्षांपर्यंत आहे. साधारणपणे लहान पक्षी, मासे आणि बेडूक हे त्याचे भक्ष्य असते. जेव्हा त्याला धोका वाटतो तेव्हाच तो आपला फणा पसरवतो. धोका जाणवताच तो लगेच विष फेकतो. अगदी झोपेत असतानाही तो हल्ला करू शकतो.