विटा : पुढारी वृत्तसेवा
येथे अतिशय विषारी अशा 'कोरल स्लेन्डर स्नेक' जातीचा पोवळा साप आढळला. विट्याचे उपनगर असलेल्या सूर्यनगर येथे चंद्रकांत भानुदास सूर्यवंशी यांच्या वस्ती घरासमोर जनावरांचा गोठा आहे. सकाळी ते गोठ्यात गेले असता त्यांना गोठ्यामध्ये आवाज आला.
त्यावरून त्यांनी गोठ्यातल्या वस्तू बाजूला करून पाहिले असता त्यांना साप दिसला. त्यांनी तत्काळ सर्पमित्र विजय सूर्यवंशी यांना बोलावले. तोपर्यंत आजूबाजूचे लोक तिथे गोळा झाले. विजय सूर्यवंशी यांनी साप काठीने पकडून त्याचे निरीक्षण केले. त्यांना तो विषारी पोवळा साप असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ त्या सापाला बाटली बंद केले. हा विषारी साप आहे. या सापामध्ये न्यूरॉटॉक्सिन नावाचे विष असते. त्यामुळे स्नायू शिथिल पडणे किंवा अर्धांगवायू होणे अशा प्रकारची लक्षणेे दिसतात. हा साप भीती दाखविण्यासाठी शेपटी गोल करून तांबूस-नारिंगी भाग दर्शवितो.