Mango : जगातील सर्वात महागडा आंबा!

Mango : जगातील सर्वात महागडा आंबा!
Published on
Updated on

टोकियो : जपानमध्ये जगातील सर्वात महागडी फळे पाहायला मिळतात. (Mango) त्यामध्ये रुबी रोबन ग्रेप्स या लाल द्राक्षांचा, युबारी किंग टरबूजचा आणि डेन्सुके कलिंगडचा समावेश आहे. मात्र, तिथे जगातील सर्वात महागडा आंबाही मिळतो याची तुम्हाला कल्पना आहे का? जगातील सर्वात महाग आंब्याला 'तैयो नो तामांगो' या नावाने ओळखले जाते. ज्याचा अर्थ जपानी भाषेत 'सूर्याची अंडी' असा आहे. ही आंब्याची एक दुर्मीळ जात आहे. जपानमधील मियाझाकी शहरात याची लागवड केली जाते. या लाल, जांभळ्या रंगाच्या दोन आंब्यांची किंमत सुमारे 36 लाख रुपये इतकी आहे!

मियाझाकी हे शहर जपानच्या दक्षिणेकडील भागात स्थित आहे, जे उबदार आणि चांगल्या हवामानासाठी ओळखले जाते. साधारणपणे एप्रिल ते जुलैदरम्यान या आंब्याचे उत्पादन घेता येते. 'तैयो नो तामांगो' आंबा हा त्याच्या गोड चवीसाठी आणि मऊ पोत यासाठी ओळखला जातो. जपानमधील एक सर्वात लक्झरी फळ मानले जाते. या आंब्याची विशेष बाब म्हणजे ते अत्यंत मर्यादित प्रमाणात पिकवले जाते आणि त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी काळजीपूर्वक हाताने उचलून पॅक केले जातात.

जपानमध्ये 2019 साली तैयो नो तामांगो या जातीचे दोन आंबे लिलावात 5 मिलियन येन या विक्रमी किंमतीत विकले गेले. भारतीय चलनात या दोन आंब्याची किंमत 36 लाख रुपये आहे. म्हणून या आंब्याला जगातील सर्वात महागडा आंबा मानले जाते. तैयो नो तामांगो आंबाचा उच्च दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ते प्रगत तंत्र वापरून काळजीपूर्वक पिकवले जातात. त्याची वाहतूकही विशेष पॅकिंगनंतर केली जाते. हे फळ अस्सल असल्याची खात्री करण्यासाठी त्याच्या बॉक्सवर सत्यतेचे प्रमाणपत्र देखील असते.

तैयो नो तामांगो हे आंबे अनेकदा महागडी भेटवस्तू म्हणून दिले जातात. त्याचबरोबर फळांचे शौकीन असणारे श्रीमंत लोक हे आंबे आवडीने खातात. तैयो नो तामांगो हा आंबा सरासरी वजनाला सुमारे 350 ग्रॅम असतो. तसेच त्यातील साखरेचे प्रमाण हे सामान्य जातीच्या आंब्यांपेक्षा 15 टक्के जास्त असते. याशिवाय यामध्ये अँटिऑक्सिडंटस्, बीटा-कॅरोटिन आणि फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात आढळते. लाल किंवा जांभळ्या रंगाचा हा आंबा आता बांगलादेश, भारत, थायलंड आणि फिलिपाईन्समध्येही पिकवला जात आहे.

.हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news