Elephant Behaviour | अन्नाच्या टंचाईमुळे आशियाई हत्तींची ‘मैत्री’ तुटतेय!

Elephant Behaviour |
Elephant Behaviour | अन्नाच्या टंचाईमुळे आशियाई हत्तींची ‘मैत्री’ तुटतेय!
Published on: 
Updated on: 

नवी दिल्‍ली : जंगलात अन्नाची कमतरता निर्माण झाल्यास आशियाई हत्तींचे सामाजिक संबंध आणि कळपातील मैत्री तुटत असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. आफ्रिकन हत्ती संकटाच्या काळात एकत्र येऊन मोठे कळप तयार करतात, मात्र आशियाई हत्ती याउलट वागतात. अन्नाच्या टंचाईमुळे ते एकमेकांपासून दूर होऊन लहान-लहान गटांमध्ये विखुरले जात आहेत. हत्तींमधील या ‘सामाजिक विघटनामुळे’ (सोशल ब्रेकडाऊन) त्यांच्या पुढील पिढीच्या अस्तित्वावरच दीर्घकालीन धोका निर्माण झाला असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

‘सायन्स’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन डिएगोच्या संवर्धन शास्त्रज्ञ शर्मिन डी सिल्वा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीलंकेतील ‘उडावालावे नॅशनल पार्क’मधील ४४३ मादी हत्तींच्या सामाजिक संबंधांचा १२ वर्षे सखोल अभ्यास केला. २००७ मध्ये या उद्यानात हत्तींचे २० कळप होते आणि प्रत्येक कळपात सरासरी १४ हत्ती होते. मात्र, उद्यानातील गवताळ कुरणे नष्ट होऊन तिथे अखाद्य झुडपे वाढल्याने अन्नाची तीव्र टंचाई निर्माण झाली. परिणामी, हत्तींची संख्येत घट होऊ लागली. २०१८ पर्यंत कळपांची संख्या वाढून ३७ झाली, तर एका कळपातील हत्तींची सरासरी संख्या केवळ ३.५ इतकी खाली आली.

या सामाजिक विघटनाचे भयानक परिणाम दिसून येत आहेत. संशोधनादरम्यान ‘जॅस्मिन’ नावाच्या एका तरुण हत्तिणीची हृदयद्रावक घटना समोर आली. तिची जवळची मैत्रीण ‘जॅनेट’ मरण पावल्यानंतर जॅस्मिनने इतर हत्तींशी मैत्री न करता एकटे राहणे पसंत केले. ती उद्यानाबाहेर भटकू लागली आणि अखेरीस गोळी लागून तिचा मृत्यू झाला. अन्नासाठी वाढलेली स्पर्धा आणि कमी ऊर्जेमुळे हत्ती नवीन नाती जोडणे टाळत आहेत.

शास्त्रज्ञांच्या मते, मादी हत्ती कळपात राहिल्याने पिल्लांचे संगोपन करणे, अन्नाचे स्रोत शोधणे आणि धोक्यापासून बचाव करणे सोपे जाते. कळप तुटल्यामुळे अनुभवी हत्तींकडून पिल्लांना मिळणारे जीवनोपयोगी ज्ञान थांबले आहे. त्यामुळे हत्तींची संख्या घटण्याची वाट न पाहता, अधिवास संवर्धनाची पावले तातडीने उचलणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.