

Earth 25 Hour Day
नवी दिल्ली: अनेकांना नेहमीच असे वाटते की, दिवसात एखादा तास अधिक असता तर किती बरे झाले असते. वैज्ञानिकांच्या मते, भविष्यात मानवाची ही इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे, मात्र त्यासाठी तब्बल २० कोटी वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पृथ्वीच्या परिवलनाचा वेग (स्वतःभोवती फिरण्याची गती) हळूहळू मंदावत असल्याने, भविष्यात पृथ्वीवर २४ ऐवजी २५ तासांचा एक दिवस असेल, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
पृथ्वीची गती मंदावण्यामागे 'चंद्र' हे सर्वात मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्रात भरती-ओहोटी येते. ही प्रक्रिया पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर एखाद्या 'ब्रेक'प्रमाणे काम करते. सोप्या भाषेत सांगायचे तर, एखादी फिरणारी खुर्ची पायाने हलकेच दाबून धरल्यावर तिचा वेग जसा कमी होतो, तसाच काहीसा परिणाम चंद्राच्या ओढीमुळे पृथ्वीवर होत आहे. 'नासा'च्या वैज्ञानिकांनीही याला दुजोरा दिला असून, चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून काही सेंटीमीटर दूर सरकत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
पृथ्वीचा इतिहासात पाहिल्यास असे लक्षात येते की, अब्जावधी वर्षांपूर्वी दिवसाचा कालावधी अत्यंत कमी होता. टोरंटो विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ नॉर्मन मरे आणि त्यांच्या चमूने केलेल्या संशोधनानुसार, गेल्या कोट्यवधी वर्षांत दिवसाची लांबी सतत बदलत राहिली आहे. जुन्या सूर्यग्रहणांच्या नोंदी आणि अत्याधुनिक 'ॲटॉमिक क्लॉक'च्या साहाय्याने वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या वेगातील या बदलाचा अचूक अंदाज बांधला आहे.
केवळ चंद्रच नाही, तर पृथ्वीवरील इतर नैसर्गिक आणि मानवनिर्मित बदलही या प्रक्रियेवर परिणाम करत आहेत. पर्वतांवरील बर्फ वितळल्यामुळे पृथ्वीच्या वस्तुमानाचे संतुलन बदलत आहे. मोठ्या धरणांमध्ये साठवलेल्या पाण्यामुळेही पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगावर सूक्ष्म परिणाम होतो. बर्फ वितळल्याने समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढ दिवसाची लांबी वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे.
जसा 'लीप इयर'चा संकल्पना आपल्याला परिचयाची आहे, तसाच 'लीप सेकंद'ही असतो. जेव्हा पृथ्वीची फिरण्याची नैसर्गिक गती आणि मानवनिर्मित अचूक घड्याळे यांच्यात फरक पडतो, तेव्हा वैज्ञानिक वेळ जुळवण्यासाठी एक सेकंद वाढवतात किंवा कमी करतात. पृथ्वीच्या गतीवर वैज्ञानिक किती सूक्ष्म लक्ष ठेवून आहेत, यावरून हे समजत.
वैज्ञानिकांनी चिंतेचे कोणतेही कारण असल्याचे सूचित केलेले नाही. आजपासून २० कोटी वर्षांनंतर घडण्याचा अंदाज असलेल्या घटनांचा, आपल्या आजच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. ही निश्चितच एक रंजक वैज्ञानिक वस्तुस्थिती असली, तरीही याबद्दल घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.