

डॉ. राजेंद्र बगाटे
विकासाच्या शर्यतीत मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणामुळे पर्यावरणीय संकटे तीव— होत चालली आहेत. अशा पार्श्वभूमीवर ‘जागतिक वसुंधरा दिन’ आपल्याला शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारून पृथ्वीचे संरक्षण करण्याची जाणीव करून देतो.
दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा केवळ दिनविशेष नसून पृथ्वीवरील जीवनाच्या अस्तित्वाशी निगडित असलेली एक गंभीर जाणीव आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाने अभूतपूर्व विकास साधला असला, तरी या विकासाच्या बदल्यात पृथ्वीच्या संसाधनांवर प्रचंड ताण निर्माण झाला. हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, जैवविविधतेचा र्हास आणि जलसंकट यांसारख्या समस्यांनी जगाला वेढले आहे. त्यामुळे वसुंधरा दिन आत्मपरीक्षणाचा दिवस ठरतो. केवळ एक दिवस साजरा करून पर्यावरण वाचणार नाही, हा विचार दैनंदिन जीवनात रुजवणे अधिक आवश्यक आहे. आज पर्यावरणीय संकट अत्यंत गंभीर बनले आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकाने वापर होत आहे. जंगलतोडीमुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. नद्या, तलाव आणि समुद्र प्रदूषणाने ग्रासले आहेत. हवेत विषारी वायूंचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. यालाच ‘जागतिक तापमानवाढ’ म्हणतात. परिणामी, हिमनद्या वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे आणि नैसर्गिक आपत्तींची तीव—ता वाढत आहे. याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत आहे.
हवामान बदल हा आजचा सर्वात गंभीर प्रश्न आहे. पावसाचे चक्र विस्कळीत झाले आहे. कुठे अतिवृष्टी, तर कुठे दुष्काळ. विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाचा विनाश करत आहोत. शाश्वत विकास ही संकल्पना महत्त्वाची ठरते. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम न होईल असा विकास. यासाठी नैसर्गिक संसाधनांचा मर्यादित आणि जबाबदारीने वापर, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब, नवीकरणीय ऊर्जेचा वापर आणि कचर्याचे पुनर्चक्रण आवश्यक आहे.
जैवविविधता ही पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. विविध वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव पर्यावरणाचा समतोल राखतात; मात्र मानवी क्रियांमुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जंगलांचे संवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन यावर भर देणे गरजेचे आहे. जलसंकट ही आणखी एक गंभीर समस्या आहे. भूजलाचा अतिरेकाने वापर, पावसाच्या पाण्याचा अपुरी साठवण क्षमता आणि जलप्रदूषण यामुळे पाण्याची टंचाई वाढत आहे. पावसाचे पाणी साठवणे, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलस्रोतांचे संरक्षण ही आजची गरज आहे. कचरा व्यवस्थापन हा पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. केवळ शासनावर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकानेही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून पर्यावरण संरक्षण शक्य आहे. सौर, वारा आणि जलऊर्जा यांसारख्या नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवणे, ऊर्जा कार्यक्षम साधनांचा वापर, हरित इमारती आणि स्मार्ट शहरांची उभारणी यामुळे पर्यावरणावरचा ताण कमी होऊ शकतो.
वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने काही ठोस संकल्प करायला हवेत. झाडे लावणे, पाणी वाचवणे, कचरा कमी करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे, या लहान कृतीदेखील मोठा बदल घडवू शकतात. पर्यावरण संवर्धन ही केवळ जबाबदारी नसून आपल्या अस्तित्वाची गरज आहे. शेवटी, पृथ्वी ही आपली मालमत्ता नसून आपण तिचे पालक आहोत, ही जाणीव महत्त्वाची आहे. पुढील पिढ्यांसाठी ही वसुंधरा सुरक्षित आणि समृद्ध ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज योग्य पावले उचलली, तरच उद्याचा पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा मार्ग आपण सुनिश्चित करू शकतो.