न्यूयॉर्क : चालकरहित कार ही काही आता नवलाई राहिलेली नाही; मात्र भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकासह काही संशोधकांनी अशी ‘अपघातमुक्त’ मोटार तयार केली आहे. ही कार गर्दीच्या रस्त्यावरूनही चटकन मार्ग काढू शकते. ही चालकविरहित मोटार कार्नेगी मेलॉन विद्यापीठाने तयार केली असून ती रस्ता कोंडी व महामार्गावरील वाहतुकीतूनही सुरक्षित चालू शकते हे प्रात्यक्षिकात दाखवून देण्यात आले.
ही मोटार पॅसाडेनातील क्रॅनबेरी येथून पीटसबर्गपर्यंत 53 कि.मी. धावली व त्यात कुठलीही अडचण आली नाही. ही मोटार इतर 2011- कॅडिलॅक एसआरएक्स मोटारीसारखी दिसते. चालकाच्या जागेवर माणूस बसलेला असतो, पण तो केवळ सुरक्षा काळजी म्हणून असतो. प्रत्यक्षात गाडी आधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने चालवली जाते. रडार, लिडार व इन्फ्रारेड कॅमेरे यांच्या मदतीने मिळालेल्या संदेशांच्या मदतीने या गाडीला दिशा मिळत असते किंवा सॉफ्टवेअर त्याआधारे निर्णय घेत असते कार्नेगी मेलॉन विद्यापीठाच्या वाहतूक संशोधन विभागाचे प्रमुख असलेले राजकुमार यांनी सांगितले, की स्वयंचलित पद्धतीने मोटार चालवण्याचे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. ही गाडी चालकाविना लेन बदलू शकते, ट्रॅफिक लाईट बघून थांबू शकते-जाऊ शकते. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात महागडे संवेदक वापरलेले नाहीत. त्यात रडार, लिडार यांचा वापर केलेला असून त्याचे संगणक हे कार्गोमध्ये ठेवलेले आहेत. कार्डिलॅक एसआरएक्स ही मोटार वायरलेस वाहनांशी संपर्कात राहू शकते. या गाडीचा मुख्य हेतू हा अपघात कमी करणे, परिणामी प्राणहानी टाळणे, वेळ वाचवणे हा आहे. दारू पिऊन गाडी चालवणे, मोबाईल चालू असताना गाडी चालवणे यामुळे होणारे अपघातही यामुळे टळू शकतील.