

अॅम्स्टरडॅमः जीवाश्म इंधनांमुळे होणारे प्रदूषण तसेच त्यांचे गगनाला भिडलेले भाव यामुळे स्वच्छ ऊर्जेकडे जगाचे लक्ष वेधले गेले. विद्युतऊर्जा, सौरऊर्जा यांचा वाहनांसाठी वापर करणे सुरू झाले. सौरऊर्जेवर चालणारे विमानही बनवण्यात आलेले असून, त्याचे दीर्घ टप्प्याचे उड्डाणही झालेले आहे. सौरऊर्जेवर चालणारी जगातील पहिली कार बनवण्याचा मान नेदरलँडला मिळाला. विशेष म्हणजे तेथील विद्यार्थ्यांनी अशी कार बनवली होती.
नेदरलॅन्डच्या एन्धोवेन तांत्रिकी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ही सौरऊर्जेवर चालणारी कार विकसित केली. विद्यार्थ्यांनी विकसित केलेली ‘स्टेला’ ही जगातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार ठरली आहे. ही कार संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी असून, यात चार माणसे बसण्याची व्यवस्था आहे. सौरऊर्जेच्या माध्यामातून संपूर्णपणे बॅटरी प्रभारित झाल्यानंतर ही कार 600 किलोमीटर अंतर पार करू शकते, असा अंदाज आहे. प्राथमिक तत्त्वावर स्टेला कारची चाचणीही करण्यात आली आहे. ‘स्टेला’कारच्या वरच्या भागावर सौरऊर्जा ग्रहण करणार्या धातूचे आवरण देण्यात आले आहे. यामार्फत ग्रहण केली जाणारी ऊर्जा कारच्या बॅटरीमध्ये साठविली जाते त्यातून कारला ऊर्जाप्राप्त होते. परंतु, यासर्व प्रक्रियेला भरपूर वेळ लागत असल्याने एखाद्या ठिकाणी त्वरित पोहोचायचे असल्यास स्टेलाचा वापर करता येण्याजोगा नाही.