

वॉशिंग्टन : अमेरिका, चीन व जपानसारख्या देशांमध्ये चालकरहित वाहने बनवली जात आहेत. त्यामध्ये एलन मस्क यांची कंपनी 'टेस्ला'च्या मोटारींची चर्चा जगभर झाली. आता तर चालकरहित ट्रकही तयार होऊ लागले आहेत. अशाच एका सेल्फ ड्रायव्हिंग 18 चाकी ट्रकने अमेरिकेतील डलास ते अटलांटादरम्यान पाच दिवस मालवाहतुकीचे कामही केले आहे.
या ट्रकने 10 हजार 138 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा प्रवास केला. त्याने चार फेर्या मारल्या आणि आठ कंटेनर मालाची डिलिव्हरी केली. हा ट्रक एका सेल्फ-ड्रायव्हिंग स्टार्टअप कोडिएक रोबोटिक्स आणि एक ट्रक कंपनी यूएस एक्स्प्रेसने मिळून बनवला आहे. पाच दिवसांमध्येच या ट्रकने सेल्फ ड्रायव्हिंगची क्षमता काय असते हे दाखवून दिले.
सध्याच्या प्रचलित ट्रकांमध्ये एक चालक असतो जो प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामाला थांबतो आणि विश्रांती घेतो. ज्या मालाची सेल्फ ड्रायव्हिंग ट्रकने पाच दिवसांत डिलिव्हरी केली तोच माल चालक असता तर दहा दिवसांपेक्षा अधिक काळानंतर पोहोचला असता. मात्र, चालक असल्याने सुरक्षाही असते. कोडिएकने रोज तज्ज्ञांच्या एका नव्या टीमला ट्रकच्या केबिनमध्ये बसवले जेणेकरून एखादी चूक झाली तर त्यावर नियंत्रण मिळवता येईल.
कोडिएकसारख्या स्टार्टअपने सेल्फ ड्रायव्हिंग ट्रकांच्या निर्मितीसाठी आणि चाचण्यांसाठी अनेक वर्षे घालवली आहेत. ग्लोबल सप्लाय चेनवर विपरित परिणाम झाला असता असे ट्रक उपयुक्त ठरू शकतात, मात्र यामध्ये माणूस नसल्याने हा ट्रक धोकादायकही ठरू शकतो. शिवाय अशा ट्रकमुळे रोजगाराचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो व अनेक चालकांच्या नोकर्या जाऊ शकतात.