रताळे : मुलांसाठी हिवाळ्यात रताळ्याचे सेवन ठरते लाभदायक | पुढारी

रताळे : मुलांसाठी हिवाळ्यात रताळ्याचे सेवन ठरते लाभदायक

नवी दिल्ली :

हिवाळ्यात गाजर, हरभरे, रताळे मुबलक प्रमाणात मिळू लागतात. रताळ्यांचे सेवन या काळात आरोग्यासाठी लाभदायकच ठरते. मुलांच्या शारिरीक विकासासाठी रताळी गुणकारी असतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

रताळ्यात कॅल्शियम, झिंक, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस पोटॅशियम आणि सोडियम मोठ्या प्रमाणात असते. ही सर्व खनिजे व पोषक घटक मुलांच्या वाढीसाठी लाभदायक असतात. याशिवाय रताळ्यात ‘ए’, ‘सी’, ‘ई’, ‘बी-6’ आणि ‘बी-9’ ही जीवनसत्त्वेही असतात. ‘जीवनसत्त्व ए एन्थोसायनिन’ रताळ्यात असते व त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ‘बी-6’ या जीवनसत्त्वामुळे मुलांच्या मेंदूचा विकास चांगला होण्यास मदत मिळते.

‘बीटा-कॅरोटिन’ व ‘ए’ जीवनसत्त्वही मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. डोळे, चयापचय क्रिया, पोटाचे आरोग्य यासाठी रताळे गुणकारी ठरते. रताळ्यातील फायबर पचनसंस्थेसाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. वजन वाढवणे, अशक्तपणा दूर करणे यासाठीही रताळी लाभदायक ठरतात.

अधिक वाचा :

Back to top button