एलन मस्क : पुढील वर्षी मानवी मेंदूत बसवणार चिप | पुढारी

एलन मस्क : पुढील वर्षी मानवी मेंदूत बसवणार चिप

वॉशिंग्टन : ‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’सारख्या दिग्गज कंपन्यांचे प्रमुख एलन मस्क यांच्या वैज्ञानिक कल्पनाही भन्नाटच असतात. मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याची स्वप्ने पाहणारा हा धडाडीचा उद्योजक आता पुढील वर्षीपासून एक अनोखा प्रयोग सुरू करणार आहे. आपली ब्रेन इंटरफेस कंपनी ‘न्यूरालिंक’ पुढील वर्षीपासून ब्रेन चिपच्या मानवी प्रयोगाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘वॉलस्ट्रीट जर्नल’च्या वतीने आयोजित केलेल्या कौन्सिल समिटमध्ये ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी या नव्या प्रयोगाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की माकडांवरील हा मेंदूतील चिपचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. हीच सुरक्षित पद्धत असू शकते. आता मानवावर यशस्वी प्रयोग करण्यासाठी परवानगीची प्रतीक्षा आहे.

अशी परवानगी मिळताच सर्वात आधी टेट्राप्लाजिक, क्वाड्रिप्लेजिक्ससारख्या मेरुरज्जूच्या समस्या असलेल्या लोकांना आधी त्याचा लाभ दिला जाईल. त्यातही गंभीर दुखापत असलेल्या लोकांना आधी ही चिप मिळेल. न्यूरालिंक कंपनीने हे न्यूरल इम्प्लांट म्हणजेच चेतासंस्थेत प्रत्यारोपित केले जाणारे उपकरण विकसित केले आहे. या चिपच्या कार्यप्रणालीसाठी बाह्य हार्डवेअरची गरज भासत नाही.

त्यासाठी मेंदूच्या कार्यावर आधारित वायरलेस कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. दिव्यांग लोकांना नवे बळ देण्याची संधी यामधून मिळू शकते, असे मस्क यांनी म्हटले आहे. 9 एप्रिल 2021 मध्ये न्यूरालिंकने ही चिप माकडात बसवली होती. त्याचा वापर करून माकड विविध प्रकारचे खेळ खेळू शकला. त्यावेळी माकडाला योग्य ते संकेत पोहोचवण्यात आले होते.

Back to top button