‘ती’ 24 मिनिटे होती ‘मृत’; जिवंत झाल्यावर सांगितला अनुभव… | पुढारी

‘ती’ 24 मिनिटे होती ‘मृत’; जिवंत झाल्यावर सांगितला अनुभव...

न्यूयॉर्क : आजपर्यंत अनेक लोकांचे ‘निअर डेथ एक्सपिरियन्स’ म्हणजेच मृत्यूच्या जवळ असताना आलेले चमत्कारिक अनुभव सांगितलेले आहेत. अनेकांनी आपण स्थूल देह सोडून अधांतरी तरंगत असल्याचे, दुसर्‍या टोकाला प्रकाश असलेल्या बोगद्यातून प्रवास केल्याचे, झळझळीत प्रकाश पाहिल्याचे किंवा मृत नातलग पाहिल्याचे अनुभव सांगितलेले आहेत. आता हृदयविकाराच्या झटक्यानंतर 24 मिनिटे ‘मृत’ झालेल्या व नंतर ‘जिवंत’ झालेल्या एका महिलेने असाच अलौकिक अनुभव सांगितला आहे. ( Near-Death Experiences )

लॉरेन कॅनडे नावाच्या महिलेने सोशल मीडियावर तिची ही कहाणी शेअर केली आहे. तिने म्हटले आहे की, गेल्या फेब्रुवारीमध्ये मला घरी अचानक हृदयविकाराचा झटका आला. माझ्या पतीने 911 वर कॉल केला आणि सीपीआर देण्यास सुरुवात केला. डॉक्टर आले आणि त्यांनी मला मृत समजलं. सुमारे 24 मिनिटांनंतर मी पुन्हा जिवंत झाले. मला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले; पण एमआरआयमध्ये मेंदूला कोणतीही हानी झाली नसल्याचे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. त्यावेळी माझ्यासोबत जे काही घडलं ते मला स्पष्टपणे आठवते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर, माझ्या पतीने चार मिनिटे सीपीआर दिला. दरम्यान, त्यांनी 911 वर कॉल केला, तेथून डॉक्टर त्यांना अशा परिस्थितीत काय करावे हे समजावून सांगत होते. ( Near-Death Experiences )

काही वेळाने आपत्कालीन सेवाही पोहोचली आणि 24 मिनिटांनंतर माझ्या हृदयाचे ठोके सुरू झाले. मला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्यानंतर मी कोमात गेले. मी 2 दिवस कोमात होते. जेव्हा मला जाग आली, तेव्हा मी खूप गोंधळलेले होते. बरेच दिवस मला जुन्या गोष्टी आठवत नव्हत्या. आयसीयूमध्ये माझे काय झाले ते मला माहीत नाही. लॉरेन म्हणाल्या की, जेव्हा माझा मृत्यू झाला होता तेव्हा मला खूप शांत वाटत होतं, इतकंच मला आठवतं.कोमातून बाहेर आल्यानंतर काही आठवडे ती शांतता मी सतत अनुभवत होती. मी दिवस आणि वेळ विसरले होते. प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हती. मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, तेही मी विसरले होते. लॉरेन यांनी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी नेमकं काय झालं हेदेखील सांगितले. त्या म्हणाल्या, मला कोणताही प्रकाश किंवा बोगदा दिसला नाही; परंतु मला शांततेचा अनुभव जाणवला. मला असं वाटलं की, मी आराम करतेय. हे विचित्र आहे; परंतु पूर्णपणे सत्य आहे. या अनुभवानंतर आता मला मृत्यूची भीती वाटत नाही!

हेही वाचा : 

 

Back to top button