पलूस : चित्रपटातील नायकाप्रमाणे आपली शरीर संपदा असावी, असे अनेक तरुणांना वाटते. असे वाटणे गैरही नाही. त्यासाठी डॉक्टरांच्या, व्यायाम विषयातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच चित्रपट हिरोमंडळी वागत असतात, हे मात्र काही तरुण विसरतात. त्यामुळे मोठा केमिकल लोचा होतो. शरीरसौष्ठवपटू (बॉडीबिल्डर) होण्याच्या नशेत, नशाबाज होतात आणि मग जीवावरही बेतते. पलूस येथे उघड झालेल्या ताज्या घटनेवरून तरुणांनी बोध घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
पलूसमधील एका जिमशी संबंधित साहित्य विक्रीच्या दुकानात भलतेच इंजेक्शन विकले जात होते. संबंधित जीम चालक तरुणांच्या जीवाशी खेळ खेळत होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे पालकवर्ग धास्तावला आहे. या जीममध्ये जाणारा आपला मुलगा नशाबाज तरी झाला नाही, अशी चिंता पालकांना सतावत आहे. या जीममध्ये अशास्त्रीय इंजेक्शन विक्री होत असल्याचे उघड झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पलूस तालुका हा कृष्णा काठामुळे सधन मानला जातो. तालुक्यात ऊस शेती व द्राक्ष बागायत मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. किर्लोस्कर कंपनी, साखर कारखाने, एमआयडीसी या ठिकाणी काम करणार्या कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या समृद्ध तालुका असल्याने पलूसचा झपाट्याने विकास होत आहे. लोक शारीरिक तंदुरूस्तीबाबत जागरूक आहेत. त्यामुळेच तर तालुक्यात पलूस, रामानंदनगर, कुंडल येथे दिमाखात जिम सुरू केल्या आहेत.
जिममध्ये रोज घाम गाळूनही मनासारखे यश मिळत नाही. अशावेळी जीममधील काही व्यायाम प्रशिक्षक मनाला येईल तसे सल्ले देतात. स्टेरॉइड्स इंजेक्शन घेण्याविषयी ते सल्ला देतात. तो आरोग्यास किती अपायकारक आहे याचा विचार ते करत नाहीत, असे काही डॉक्टरांशी संवादानंतर जाणवले.
स्टेरॉइड्स इंजेक्शन घेणे एखाद्या व्यसनासारखे आहे. जसे एकदा लागलेले सिगारेटचे व्यसन सुटणे शक्य पण महाकठीण तसेच होते. तालुक्यातील सर्वच जिमचालक असे अनधिकृत काम करत नाहीत, परंतु संशयाचे धुके वाढते आहे. याचे कारण एका घटनेमुळे संशयाची सुई सगळीकडे पसरते. पलूसमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अमोल पवार म्हणाले, अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही धाक नसल्याने संबंधित इंजेक्शन, स्टिरॉइड इंजेक्शन असे ड्रग्स बर्याच जिममध्ये सर्रास वापरली जातात. हे अत्यंत धोकादायक आहे. शरीरसंपदा कमावण्याच्या नादात काहीही ज्ञान नसलेले व्यायाम प्रशिक्षक (जिम ट्रेनर) खूप चुकीची माहिती देतात. हे शॉर्टकट आरोग्यासाठी कायमचेच धोकादायक होऊ शकतात. मूत्रपिंड (किडनी) यकृत (लीवर ) कायमचेच खराब होण्याची खूप शक्यता असते. अशा ड्रग्स सप्लिमेंट्स पासून सर्वांनी दूर राहावे.
कोणतीही शस्त्रक्रिया करताना रुग्णाला भूल दिली जाते. त्यावेळी त्याचा उच्चदाब कमी होतो. तो यथोचित राहण्यासाठी संबंधित इंजेक्शन दिले जाते. एक बाटली दहा एमएलची असते. त्यामधील एक मिली घेतले जाते. त्या एक मिलीमध्ये तीस मिलिग्रॅम आहेत. त्या तीस मिलिग्रॅम मधून रुग्णाला पाच ते सहा मिलिग्रॅम इंजेक्शन देतो. परंतु जिममध्ये याचा विचार केला जात नसावा. तरुणांनी सातत्याने इंजेक्शन घेतले तर हृदयाचे ठोके वाढून त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे भूलतज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
पलूसमधील एम. डी. फिजिशियन डॉ. पृथ्वीराज पाटील यांचे मत जाणून घेतले. ते म्हणाले, संबंधित इंजेक्शन हे मानसोपचार तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ यांच्याशिवाय इतरांना दिले जात नाही. हे इंजेक्शन घेण्याने तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाब वाढतो. तसेच अनेक मानसिक आजार होतात. सातत्याने घेणार्या इंजेक्शनमुळे लैंगिक, आर्थिक गुन्हे वाढतात. तालुक्यात अशा रुग्णांची वाढ होत आहे. एम. डी. फिजिशियन असूनसुद्धा आम्हाला हे इंजेक्शन ठेवता येत नाही. त्यामुळे असे इंजेक्शन ठेवणार्यांवर तपास करून कठोर कारवाई केली पाहिजे.