वॉशिंग्टन : 'व्होएजर-2' हे जूने अंतराळयान पृथ्वीपासून अब्जावधी किलोमीटर दूर निघून गेलेले आहे. त्याच्याशी आठवडाभरापूर्वी संपर्क तुटला होता. मात्र, आता 'नासा'ने म्हटले आहे की 'व्होएजर-2'ने पृथ्वीकडे 'हार्टबीट' सिग्नल पाठवला आहे. सॅटेलाईटसारख्या असणार्या या यानाला सन 1977 मध्ये बाह्यग्रहांचा शोध तसेच व्यापक ब—ह्मांडातील जीवसृष्टीचा छडा लावण्यासाठी लाँच करण्यात आले होते. सध्या ते पृथ्वीपासून 19.9 अब्ज किलोमीटरवर दूर निघून गेले आहे.
'नासा'च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने म्हटले आहे की 21 जुलैला 'व्होएजर-2' ने पाठवलेल्या प्लॅन्ड कमांडस्च्या एका सीरिजमुळे 'अँटिना चुकून पृथ्वीपासून दोन अंश दूर गेला'. त्यामुळे तो आपल्या मिशन कंट्रोलकडून डेटा ट्रान्समिट किंवा कमांड रिसिव्ह करू शकत नव्हता. या स्थितीमध्ये 15 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच जोपर्यंत 'व्होएजर-2' आपल्या सिस्टीमला रिसेट करीत नाही तोपर्यंत सुधारणा होण्याची आशा नव्हती. 'व्होएजर' प्रोजेक्ट मॅनेजर सुझान डोड यांनी सांगितले की यानाशी संपर्क स्थापन करण्याच्या शेवटच्या प्रयत्नांमध्ये टीमने डीप स्पेस नेटवर्कची मदत घेतली. एका विशाल रेडियो अँटेनाची एक आंतरराष्ट्रीय सीरिज अंतराळात आहे. तसेच अन्यही तत्सम यंत्रणा कार्यरत आहेत व त्यांचा आधार घेण्यात आला. सुदैवाने हा प्रयोग यशस्वी ठरला आणि वैज्ञानिक या यानाच्या 'हृदयाचे ठोके' ऐकण्यात यशस्वी झाले. त्यांनी सांगितले, आता आम्हाला माहिती आहे की हे यान 'जिवंत' आहे आणि सक्रिय आहे. त्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. डोड यांनी सांगितले की टीम आता अंतराळयानाच्या अँटेनाला पृथ्वीच्या दिशेने वळवण्यासाठी एक नवी कमांड तयार करीत आहे. मात्र, तो पुन्हा काम करण्याची शक्यता अतिशय कमी आहे. अर्थात 15 ऑक्टोबर अजून दूर आहे, या कालावधीत 'नासा' या कमांडस्ना पाठवण्याचे प्रयत्न करीत राहील. 'व्होएजर-2' आणि पृथ्वीमधील अंतर पाहता सिग्नल आपल्या सौरमंडळातून यानापर्यंत एका दिशेत पोहोचण्यासाठी सुमारे 18.5 तास लागतात.
.हेही वाचा