चीन चक्क अंतराळात करणार शेती? | पुढारी

चीन चक्क अंतराळात करणार शेती?

बीजिंग :  चीनने अंतराळ संशोधन क्षेत्रात महत्त्वाची आघाडी घेतली आहे. या देशाने आपले स्वतःचे अंतराळ स्थानकही निर्माण केलेले असून तिथे चीनचे अंतराळवीर राहून विविध वैज्ञानिक प्रयोग करीत आहेत. अमेरिका, रशिया यांचा पुढाकार असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी हे चिनी अंतराळ स्थानक स्पर्धा करीत आहे. आता चीनने आपल्या या अंतराळ स्थानकावर विविध वनस्पतींच्या 136 बिया तसेच वनस्पतींची जेनेटिक सामग्री पाठवली आहे जी 53 संस्थांमधून गोळा करण्यात आली होती. त्यामुळे चीन जणू काही अंतराळात शेतीच करण्याची तयारी करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

‘शेनझू 16’ मोहिमेत मे महिन्यामध्ये या 136 बिया पाठवण्यात आल्या. ‘चायना मॅन्ड स्पेस एजन्सी’ने आता दिलेल्या माहितीनुसार तियांगोंग अंतराळ स्थानकावर या 136 बिया व वनस्पतींची जनुकीय सामग्री पाठवलेली आहे. त्यामध्ये 47 पिके आहेत. या 47 पिकांपैकी 12 धान्यांच्या पिकांच्या बिया असून 28 नगदी पिकांचे बीज आहेत. याशिवाय जंगली वनस्पती, गवत, फुलझाडे आणि वनौषधींच्या 76 प्रजातीही अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आल्या आहेत. कृषी तसेच औद्योगिक सूक्ष्मजीव, खाद्य कवक, शैवाल यांच्यासह अन्य 13 सूक्ष्म जीवही या स्थानकावर पाठवण्यात आले आहेत. चीनने 1980 च्या दशकापासूनच अंतराळात प्रजननाशी निगडीत प्रयोग सुरू केले होते. अशा प्रकारचे प्रयोग आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरही केले जात आहेत. चीनने 2022 मध्ये तियांगोंग स्पेस स्टेशनची निर्मिती पूर्ण केली होती. अलीकडेच ‘शेनझू 16’ या अंतराळयानातून अंतराळवीरांचे एक पथक या स्थानकावर गेले आहे. या अंतराळ स्थानकात अंतराळवीर पाठवण्याची ही चीनची पाचवी मोहीम आहे. ‘शेनझू 15’ चे क्रू मेंबर जूनमध्ये पृथ्वीवर परत आले होते.

 .हेही वाचा

जगातील सर्वात विषारी झाड

मेंदूवरील ऑपरेशनवेळी ‘ती’ वाजवत होती व्हायोलिन

Back to top button