नवी दिल्ली : सध्या टोमॅटोंचे भाव गगनाला भिडले आहेत. लाल टोमॅटो आता जेवणातूनही गायब झाला आहे. अशा स्थितीत कुणी काळ्या टोमॅटोविषयी सांगितले तर आपल्या भुवया उंचावू शकतील. अर्थातच काळे टोमॅटोही असतात आणि ते आरोग्यासाठी लाभदायकही असतात! हे टोमॅटो जणू काही पोषक घटकांचा खजिनाच असतात.
काळ्या टोमॅटोंची शेती सर्वात आधी ब्रिटनमध्ये करण्यात आली. रे ब्राईन यांनी हा प्रयोग केला होता. जनुकीय सुधारणा करून म्हणजेच जेनेटिक म्युटेशनमधून अशा काळ्या व अधिक पोषक मूल्यं असलेल्या टोमॅटोंची निर्मिती करण्यात आली. या काळ्या टोमॅटोंमध्ये शरीरातील फ्री रॅडिकल्सविरुद्ध लढण्याची क्षमता असते. त्यामुळे कर्करोगासारख्या घातक आजारापासून बचाव होण्यास मदत होते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही काळे टोमॅटो गुणकारी ठरतात. या टोमॅटोंमध्ये 'अ' आणि 'क' ही जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात असतात. रोजच्या आहारात जर काळ्या टोमॅटोंचा समावेश केला तर हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. त्यामधील एंथोसायनिनमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका घटतो.
काळ्या टोमॅटोंमध्ये अँटी ऑक्सिडंटस् व वेगवेगळ्या प्रकारची खनिजे असतात. त्यामध्ये पोटॅशियम व मॅग्नेशियमचा समावेश होतो. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते व रक्तदाबाचा धोकाही कमी होतो. तसेच कोलेस्टेरॉलही कमी होते. काळ्या टोमॅटोमुळे लठ्ठपणा कमी करण्यासही मदत होते. रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यासही काळ्या टोमॅटोंचे सेवन गुणकारी ठरते.
हेही वाचा…