निरक्षर आईसाठी बनवले ‘डिजिटल स्पोकन’ वृत्तपत्र | पुढारी

निरक्षर आईसाठी बनवले ‘डिजिटल स्पोकन’ वृत्तपत्र

चंदिगढ : बुद्धिमत्ता, कौशल्य आणि संशोधकवृत्ती यांना वयाचे बंधन नाही. अनेक लहान मुलांनी आजपर्यंत थक्क करणारी कामगिरी करून दाखवली आहे. आता हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील झांसवा या गावातील अवघ्या 13 वर्षांच्या मुलाने अशीच कामगिरी केली आहे. किशोर कार्तिक नावाच्या या मुलाने असे डिजिटल स्पोकन वृत्तपत्र तयार केले आहे, ज्यातील बातमीवर क्लिक होताच अँकर ती वाचतो. या बातमीशी संबंधित व्हिडीओही एकाच वेळी पाहता येतील. त्याचे पेटंटही त्याने नोंदवले आहे. 25 एप्रिल रोजी त्याच्या आईच्या हस्ते या वृत्तपत्राचे उद्घाटन होणार आहे. या वृत्तपत्राला ‘श्रीकुंज’ असे नाव देण्यात आले आहे. नववीत शिकणारा कार्तिक म्हणतो, ‘या वृत्तपत्राची प्रेरणा त्याच्या आईकडून मिळाली.

कार्तिकच्या आईला वर्तमानपत्रातील बातम्या आवडतात; पण तिला कसे वाचायचे हे माहीत नाही त्यामुळे तिची गैरसोय होत असे. आईची अडचण समजून घेऊन त्याने वर्तमानपत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जोडून त्यावर काम करायला सुरुवात केली. तो म्हणाला की वृत्तपत्राची कितीही पाने आटिर्र्फिशियल इंटेलिजन्सशी जोडू शकतो. सध्या त्याला ‘श्रीकुंज’ या वर्तमानपत्रावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. वृद्ध आणि अशिक्षित लोकांबरोबरच अंध व्यक्तींनाही या नवीन उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.

कार्तिक गेल्या 3 महिन्यांपासून या भविष्यातील ई-पेपरवर काम करत होता. वडील अजित सिंग हे दहावी पास असून शेती करतात. ते नेहमी कार्तिकला प्रोत्साहन देत राहतात. ते सांगतात की, खेळाचे सामान, चॉकलेट, आईस्क्रीम आणि इतर मुलांप्रमाणे फिरण्याचा हट्ट न धरता मुलगा फक्त मोबाईल रिचार्ज आणि इंटरनेटची मागणी करतो. आई सुशीला सांगतात, ‘आधी आमच्या कुटुंबाला कोणी ओळखत नव्हते. मुलामुळे आता समाजसेवक, राजकारणाशी संबंधित लोक, व्हीआयपी घरात येऊ लागले आहेत.

कार्तिकचे जे अ‍ॅप बनवल्याबद्दल कौतुक होत आहे, ते अँड्रॉईड फोनवरूनच त्याने विकसित केले आहे. मुलाच्या या कौशल्यावर खूश होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी कार्तिकला लॅपटॉप भेट दिला होता. त्याच्या मदतीने कार्तिकने वृत्तपत्र तयार केले. कार्तिक हा कलोई, झज्जर येथील जवाहर नवोदय शाळेचा विद्यार्थी आहे. शाळा व्यवस्थापनाने त्याला वसतिगृहात न राहता घरी राहून अभ्यास करण्याची आणि ऑनलाईन वर्गाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

.हेही वाचा

दीर्घायुषी जपानी लोकांचा ‘असा’ असतो आहार… 

 

Back to top button