तांदळाच्या दाण्याइतक्या कॅप्सूलमुळे ऑस्ट्रेलियात खळबळ, शोधासाठी कॉमनवेल्थ देशांची मागितली मदत | पुढारी

तांदळाच्या दाण्याइतक्या कॅप्सूलमुळे ऑस्ट्रेलियात खळबळ, शोधासाठी कॉमनवेल्थ देशांची मागितली मदत

सिडनी : तांदळाच्या दाण्याइतक्या आकाराच्या एका छोट्याशा कॅप्सूलमुळे सध्या ऑस्ट्रेलियात खळबळ माजली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अधिकार्‍यांनी इशारा दिला आहे की एक घातक रेडिओअ‍ॅक्टिव्ह म्हणजेच किरणोत्सर्गी कॅप्सूल ( Radioactive Capsule ) हरवला आहे आणि कदाचित तो सापडण्याची शक्यताही नाही. तांदळाच्या दाण्याइतक्या आकाराचे हे कॅप्सूल खाणीपासून पर्थ शहरातील डेपोपर्यंतच्या दीर्घ ट्रक प्रवासावेळी कुठे तरी गायब झाला. या कॅप्सूलला शोधण्यासाठी आता कॉमनवेल्थ देशांची मदत मागितली गेली आहे.

‘सिजियम-137’ पदार्थाला स्पर्श करणेही ठरते प्राणघातक

मेटल डिटेक्टर आणि रेडिओअ‍ॅक्टिव्ह उपकरणांच्या मदतीने 8 मिलीमीटर लांब आणि 6 मिलीमीटर रुंदीच्या या छोट्याशा कॅप्सूलला 36 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर शोधले जात आहे. ( Radioactive Capsule ) हे कॅप्सूल रेडिओअ‍ॅक्टिव्ह पदार्थाचे असल्याने ते अत्यंत घातक ठरू शकते. ‘सिजियम-137’ नावाच्या या पदार्थाला स्पर्श करणेही प्राणघातक ठरू शकते. या कॅप्सूलसारखी वस्तू आढळल्यास त्यापासून दूर राहावे असा सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे. अधिकार्‍यांनी या ट्रकच्या मार्गाचा अचूक छडा लावण्यासाठी जीपीएस डेटाचा वापर केला आहे.

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया रेडिएशन सर्व्हिसेजचे मॅनेजर लॉरेन स्टीन यांनी सांगितले की या कॅप्सूलपासून एक मीटरच्या अंतरावरही उभे राहिले तरी सुमारे 17 एक्स-रेइतके रेडिएशन आपल्या शरीरावर येऊ शकते. डिपार्टमेंट ऑफ फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेसने म्हटले आहे की या कॅप्सूलचा शोध घेण्यासाठी नव्या हाय टेक सेन्सरचा वापर केला जाईल. हा ट्रक 12 जानेवारीला खाणीतून बाहेर पडला आणि तो 16 जानेवारीला पर्थला पोहोचणार होता. कॅप्सूलच्या केसचे एक बोल्ट या प्रवासात कुठे तरी सैल झाले आणि बोल्टच्या छिद्रातून घरंगळून हे कॅप्सूल बाहेर पडले असे सांगितले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button