

नवी दिल्ली : जगाच्या पाठीवरील काही ठिकाणे रहस्यमय मानली जात असतात. त्यामध्येच अरुणाचल प्रदेश आणि तिबेटदरम्यान कुठे तरी असलेल्या 'शांगरी-ला' नावाच्या दरीचाही समावेश होतो. या दरीमध्ये काळाचा प्रभाव पडत नाही असे म्हटले जाते. काही लोक ही दरी निव्वळ काल्पनिक असल्याचेही मानतात.
शांगरी-ला या दरीचा संबंध थेट दुसर्या जगाशी जोडला जात असतो. जगातील अनेक लेखकांनी या दरीविषयी लिहिले आहे. बिटिश लेखक जेम्स हिल्टन यांनी 1933 मध्ये लिहिलेल्या 'लॉस्ट हॉरिझन' या कादंबरीत 'शांगरी-ला'चे वर्णन आहे. ही एक आनंदाची भूमी असून तेथील लोक अतिशय धीम्या गतीने वृद्ध होत असतात, असे या कादंबरीत म्हटले आहे. त्यांचे वय इतके असते की ते जवळजवळ अमरच असल्यासारखे असतात असेही या कादंबरीत म्हटले आहे. आसामी भाषेतील साहित्यकार अरुण शर्मा यांच्या 'तिबेटची ती रहस्यमय दरी' असे शीर्षक असलेल्या पुस्तकातही तिचे वर्णन आहे.
शांगरी-ला दरीत काळाचा प्रभाव नगण्य असल्याचे एका लामाने आपल्याला सांगितले होते, असे या लेखकाचे म्हणणे आहे. या दरीचा उल्लेख तिबेटी भाषेत लिहिलेल्या 'काल विज्ञान' पुस्तकातही आहे. तिबेटी विद्वान युत्सुंग यांनी म्हटले आहे की ते स्वतः या दरीत गेले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार या दरीत सूर्याचा किंवा चंद्राचा प्रकाश नाही; पण तरीही चारही बाजूला एक रहस्यमय प्रकाश पसरलेला असतो. काही लोक या दरीला आध्यात्मिक नियंत्रण केंद्रही म्हणतात. काहीजण या दरीचा उल्लेख 'सिद्धाश्रम' असा करतात.
अनेक लोकांनी या दरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अगदी चिनी सैनिकांनी तसा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. काही लोक ही 'शांगरी-ला' नावाची दरी तिबेटजवळील नव्हे तर गिलगिट-बाल्टिस्तानमधील हुंझा व्हॅली असावी असे म्हणतात. याचे कारण म्हणजे ही सुंदर दरीही उंच पर्वतशिखरांनी वेढलेली असून तेथील लोक दीर्घायुषी आणि अधिक काळ तरुण राहणारे असतात.
हे ही वाचा :