पाच वर्षांत ‘त्याने’ घटवले 500 किलो वजन! | पुढारी

पाच वर्षांत ‘त्याने’ घटवले 500 किलो वजन!

रियाध : खालिद बिबन मोहसेन शारी नावाच्या या तरुणाला एके काळी जगातील सर्वात वजनदार जिवंत माणूस ( World’s Heaviest Man )  घोषित करण्यात आले होते. एके काळी त्याचे वजन तब्बल 610 किलो होते आणि त्याला उपचारासाठी घरातून हलवण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला होता. आता या तरुणाचे वजन केवळ 68 किलो झालेले आहे. त्याने 542 किलो वजन घटवले आहे.

खालिदचा जन्म 28 फेब्रुवारी 1991 मध्ये सौदी अरेबियात झाला. 2013 च्या ऑगस्ट महिन्यात खालिदला ‘जगातील आजपर्यंतची दुसर्‍या क्रमांकाची सर्वात वजनदार व्यक्ती’ तसेच ‘जगातील सर्वात वजनदार जिवंत व्यक्ती’ घोषित करण्यात आले. 2013 मध्ये या तरुणाचे वय 22 वर्षे होते. त्यावेळी त्याचे वजन होते 610 किलो. त्याच्यापेक्षा अधिक वजनाचा माणूस होता जॉन ब्राउनर मिनोच. त्याचा त्यावेळी मृत्यू झालेला होता. 610 किलो वजन असताना खालिद चालूही शकत नव्हता. त्याला क्रेनच्या सहाय्याने त्याच्या घरातून बाहेर आणण्यात आले.

2013 मध्ये तत्कालीन सौदी राजे किंग अब्दुल्ला यांनी त्याला रियाधमध्ये येऊन वजन घटवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. त्याच्यासाठी खास अमेरिकेतून क्रेन आणण्यात आली होती. त्याला एअरलिफ्ट करून रियाधमध्ये आणण्यात आले. त्याचे वजन कमी करण्यासाठी उपचार आणि सर्जरीशिवाय संतुलित आहारावरही भर देण्यात आला. त्यानंतर पुढील सहा महिन्यांत त्याने आपले वजन निम्म्याने घटवण्यात यश मिळवले व ते 320 किलो झाले. उपचारासाठी त्याला रियाधच्या किंग फाहद मेडिकल सिटीमध्ये आणण्यात आले होते. तिथे काही वर्षे त्याच्यावर उपचार करण्यात आले. ( World’s Heaviest Man )

तीन वर्षांनी म्हणजेच 2016 मध्ये त्याने स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये तो जिमर फ्रेमसह चालत असताना दिसत होता. 2018 मध्ये जानेवारीत त्याच्या शरीरावरील अतिरिक्त त्वचा हटवण्यासाठी एक शेवटची सर्जरी करण्यात आली. त्यानंतर तो जगासमोर आला त्यावेळी अवघे जग थक्कच झाले. पाच वर्षांनंतर खालिदचे वजन एकूण 542 किलोंनी कमी झाले होते. आज खालिद 68 किलो वजनाचा आहे. आता त्याच्याकडे पाहिल्यावर कुणालाही असे वाटत नाही की एके काळी तो 610 किलो वजनाचा होता!

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button