चीनमध्ये सापडले ‘टी-रेक्स’सारखे डोके असलेल्‍या पक्ष्याचे जीवाश्म | पुढारी

चीनमध्ये सापडले ‘टी-रेक्स’सारखे डोके असलेल्‍या पक्ष्याचे जीवाश्म

बीजिंग : तब्बल 12 कोटी वर्षांपूर्वी म्हणजेच क्रेटाशियस काळाच्या सुरुवातीस एक असा पक्षी अस्तित्वात होता ज्याचे डोके टी-रेक्स डायनासोरसारखे होते. हा पक्षी एक उत्तम शिकारी होता आणि झडप घालून आपल्या भक्ष्याला पकडत असे. चीनमध्ये अशा पक्ष्याचे जीवाश्म सापडले आहे. डायनासोरपासून वेगळी वैशिष्ट्ये पक्ष्यांच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात कधीपासून दिसून येऊ लागली, याचा अभ्यास करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. ( T. rex-like skull discovered in China )

डायनासोरच्या काही प्रजाती आकाशात उडू शकणार्‍याही होत्या. मात्र, या सरिसृपांपासून आधुनिक पक्षी वेगळे आहेत. 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी एका लघुग्रहाची धडक होऊन त्यामध्ये डायनासोर व अन्य अनेक जीवांचा नाश झाला. त्यामधून उडणार्‍या डायनासोरची जी काही वैशिष्ट्ये टिकून राहिली त्यांच्याशी नाते सांगणारे हे पक्षीच आहेत. ( T. rex-like skull discovered in China )

अशा थेरॉपॉडस्पासून पक्षी नेमके कसे उत्क्रांत झाले हे अद्याप अस्पष्ट आहे. ‘थेरॉपॉडस्’ हा एक असा समूह होता ज्यांची हाडे पोकळ होती आणि त्यांच्या पायाला किंवा पंज्याला तीन बोटे होती. त्यांच्यामध्ये उडणार्‍या व उडू न शकणार्‍याही डायनासोरचा समावेश होता. त्यांच्यामध्ये वेलोसिरॅप्टरसारख्या रॅप्टर्सचा समावेश होतो. आता संशोधकांनी ही नवी प्रजाती शोधली आहे. त्याला त्यांनी ‘क्रेटोनावीस झुई’ असे नाव दिले आहे.

चीनमधील एका ठिकाणी त्याचे जीवाश्म आढळून आले. अगदी सुरुवातीच्या काळातील पक्षी म्हणजे आर्चियोप्टेरीक्स. हे पक्षी 15 कोटी वर्षांपूर्वी म्हणजे ज्युरासिक काळात आढळत होते. डायनासोर काळातील ‘ऑर्निथोथोरेसीस’ हे पक्षी आधुनिक काळातील पक्ष्यांमधील अनेक वैशिष्ट्ये विकसित केलेली होती. या दोन्ही पक्ष्यांच्या काळाच्या दरम्यानच्या कालखंडात नव्या जीवाश्माच्या प्रजातीचे पक्षी अस्तित्वात होते. ‘नेचर इकॉलॉजी अँड इव्हॉल्युशन’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button