

गुवाहाटी : Rice : भारत हा जगातील सर्वात मोठ्या तांदूळ उत्पादक देशांपैकी एक आहे. देशात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते. तांदूळ हे खरेदी हंगामातील प्रमुख नगदी पीक असले तरी अनेक राज्यांमध्ये बारमाही पीकही घेतले जाते. तांदळाचे असे काही प्रकार आहेत, जे फक्त भारतातच पिकतात. एवढेच नाही तर हे प्रकार संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले आहेत. भारत बासमती तांदळाचाही मोठा निर्यातदार आहे. कोणत्याही प्रकारचा तांदूळ असो, तो गरम पाण्यातच शिजवला जातो व त्याचा खाण्यास योग्य असा भात तयार होतो. मात्र, आपल्याच देशात तांदळाचा असाही एक प्रकार आहे जो थंड पाण्यात भिजवून ठेवला तरी त्याचा मऊ भात तयार होतो!
Rice : आपण पोहे पाण्यात भिजवतो व ते खाण्यास तयार होतात. तसाच हा तांदळाचा प्रकार आहे. या तांदळासाठी तुम्हाला गरम पाणी किंवा पाणी उकळण्याची गरजच भासत नाही, केवळ थंड पाण्यातच हा तांदूळ 'शिजतो'! आसाममध्ये पिकणार्या या तांदळाला 'मॅजिकल राईस' असे संबोधले जाते. त्याचे नाव आहे 'बोका राईस' किंवा 'आसाम राईस'. नैसर्गिक सुबत्तेचे वरदान लाभलेल्या आसामची माती आणि तेथील हवामान यामुळे या तांदळाला एक वेगळीच चव आणि सुगंध असतो. बोका राईसची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप या भागांत प्रामुख्याने केली जाते.
आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजेच, जून महिन्यात बोका राईसची पेरणी केली जाते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होते. बोका तांदूळ किंवा बोका राईसची लागवड आसामच्या डोंगराळ भागांत राहणारे आदिवासी करतात. या तांदळात 10.73 टक्के फायबर आणि 6.8 टक्के प्रोटिन असते. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटकही असतात, जे वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतात. बोका राईस 50 ते 60 मिनिटे पाण्यात भिजवल्यानंतर भात तयार होतो. हा तांदूळ बोका राईस, बोका चोले आणि ओरिझा सॅटिवा म्हणून ओळखला जातो.
Rice : आसाममधील बोका तांदळापासून अनेक प्रकारचे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. हा भात दही, गूळ, दूध, साखर किंवा इतर खाद्यपदार्थांसोबत दिला जातो. बोका राईसचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे, जो थेट आसामशी संबंधित आहे. यामुळेच भारत सरकारने आसाममध्ये पिकवल्या जाणार्या या तांदळाला 'जीआय टॅग'ही दिला आहे. आता या तांदळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही केली जाते. बोका राईस शिजवायला जेवढा सोपा आहे, तेवढाच अवघड तो पिकवणं आहे. अर्धा एकर शेतातून केवळ पाच पोती तांदळाचे उत्पन्न येते. इतर तांदळाच्या जातींच्या तुलनेत हा तांदूळ 145 दिवसांत पिकून काढणीला येतो.
हे ही वाचा :