ED raids NCP leader Hasan Mushrif : मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे, निकटवर्तीयांवरही कारवाई | पुढारी

ED raids NCP leader Hasan Mushrif : मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे, निकटवर्तीयांवरही कारवाई

कागल; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल (कोल्हापूर) येथील घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. कागल शहरातील माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाच वेळी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या घरांच्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (ED raids NCP leader Hasan Mushrif)

हसून मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याचे समजते. मुश्रिफांच्या घरावर छापा पडला असल्याचे समजतात मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर तसेच गैबी चौकात गर्दी केली.

पहाटे अंधार असतानाच दिल्ली पोलीस आणि ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांचे निवासस्थान विचारत निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण निवासस्थानाला वेढा दिला. कोणाला काही समजण्याची अगोदरच अधिकारी बंगल्यात गेले. बंगल्याच्या चारीबाजूने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेले सर्व पोलीस बंदूकधारी आहेत. यामध्ये महिला पोलीस कर्मचारी अधिक आहेत.

प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानीदेखील चारीबाजूने बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. येथे कारवाई करण्यासाठी आलेले अधिकारी आणि पोलीस यांच्या गाड्यांचे दिल्ली पासिंग असल्याचे दिसून आले आहे. (ED raids NCP leader Hasan Mushrif)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे आणि गडहिंग्लज कारखान्यातील आर्थिक घोटाळ्याबाबत आरोप केले होते. किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबर रोजी ट्विट करत २०२३ या नव्या वर्षात आपले नवे निशाणे कोण असणार याची माहिती दिली होती.

किरिट सोमय्या यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये ठाकरे परिवाराचे १९ बंगले, अनिल परब, हसन मुश्रीफ, अस्लम खानचे स्टुडिओ, किशोरी पेडणेकर, एस. आर. ए .सदनिका, मुंबई महापालिका यांचा समावेश होता. या घोटाळ्यांचे हिशोब पूर्ण करणार असल्याचे सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

हे ही वाचा :

Back to top button