Dangerous Railway Line Close : भर बाजारातून जाणारी ‘ती’ ट्रेन बंद | पुढारी

Dangerous Railway Line Close : भर बाजारातून जाणारी ‘ती’ ट्रेन बंद

हनोई : एखाद्या अरुंद गल्लीतून हत्ती जात असेल, तर ते द़ृश्य कसे दिसेल? (Dangerous Railway Line Close) असाच प्रकार व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये अनेक वर्षे दिसत होता. फरक फक्त इतकाच होता की, तिथे अरुंद गल्लीतून हत्ती नव्हे; तर एक भली मोठी रेल्वे रुळावरून जात असे. ही गल्ली मुळातच अरुंद होती व त्यामध्येही रुळाच्या दोन्ही बाजूंना भाजी व फळांचा बाजार भरलेला असायचा. अशा भर बाजारातून जाणारी ही रेल्वे अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेत असे. आता ही रेल्वे बंद करण्यात आली असून, हा रस्ताही बंद करण्यात आला आहे.

इतक्या गजबजलेल्या व अरुंद जागेतून जाणारी ही जगातील एकमेव रेल्वे होती, (Dangerous Railway Line Close) असे मानले जाते. ज्यावेळी ही रेल्वे बाजारातून जात असे त्यावेळी तिथे कोणतेही बॅरिअर नसे की, तिथे रेल्वे क्रॉसिंगची सोयही नव्हती. त्यामुळे अर्थातच रेल्वेचे अशा बाजारातून, गर्दीतून जाणे धोकादायकच होते. तरीही अनेक वर्षे ही रेल्वे अशीच धावत होती आणि ती जगाचे लक्ष वेधून घेत होती. मात्र, आता हा धोकादायक प्रकार बंद करण्यात आला आहे.

अलीकडेच सुरक्षेच्या कारणावरून ही ट्रेन (Dangerous Railway Line Close) या ठिकाणाहून धावणे थांबवण्यात आले आहे तसेच हा रस्ताही बंद करण्यात आला आहे. दीर्घकाळापासून याबाबतचा विचार सुरू होता; पण निर्णय घेतलेला नव्हता. आता हे शक्य झाले असल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ही रेल्वे लाईन फ्रेंच वसाहतीच्या काळात सन 1902 मध्ये बनवण्यात आली होती. त्यावेळी हे ठिकाण शहरी गोंगाटापासून दूर होते. मात्र, हनोई शहराची अस्ताव्यस्त वाढ होत गेली तसे हा रेल्वेमार्गही एका अरुंद गल्लीत सामावला गेला. त्याच्या आजूबाजूला लोकवस्ती आणि चक्क बाजारही भरू लागला. आता मात्र हा धोकादायक रेल्वेमार्ग बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button